• Sat. Jun 13th, 2026

    लाल नाही तर पिवळं कलिंगड! ‘पिक युअर ओन’चा अनुभव मिळणार; रायगडमध्ये कृषी पर्यटनाचा अनोखा प्रयोग

    लाल नाही तर पिवळं कलिंगड! ‘पिक युअर ओन’चा अनुभव मिळणार; रायगडमध्ये कृषी पर्यटनाचा अनोखा प्रयोग

    Raigad News: रायगडमध्ये दोन शेतकऱ्यांनी पिक युअर ओन चा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. त्यांनी साधारण कलिंगडाऐवजी आरोही या पिवळ्या कलिंगडाची यशस्वी लागवड केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड: रायगड जिल्ह्यातील घोसाळे किल्ल्याच्या परिसरात यंदा एक अनोखा कृषी प्रयोग पर्यटकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. पारंपरिक लाल कलिंगडांच्या ऐवजी ‘आरोही’ या पिवळ्या गराच्या कलिंगडाची यशस्वी लागवड करून शेतकरी ऋषिकेश म्हात्रे आणि प्रवीण म्हात्रे यांनी शेती आणि पर्यटनाचा सुंदर संगम घडवून आणला आहे. ‘शेतातून थेट ताटात’ या संकल्पनेवर आधारित ‘पिक युअर ओन’ उपक्रमामुळे पर्यटकांना स्वतः शेतात जाऊन कलिंगड निवडण्याचा आणि तोडण्याचा अनोखा अनुभव मिळत आहे.

    17 ते 27 मार्च अनोखा उपक्रम

    वरून नेहमीच्या कलिंगडासारखे दिसणारे हे फळ कापल्यानंतर आतून गडद पिवळ्या रंगाचे निघते, जे पाहून अनेक जण आश्चर्यचकित होतात. चवीला अधिक गोड, मऊ आणि रसाळ असलेल्या या ‘आरोही’ वाणाने ग्राहकांचे मन जिंकले आहे. विशेष म्हणजे, बाजारात सहज उपलब्ध नसलेल्या या कलिंगडामुळे ग्राहकांना एक वेगळाच अनुभव मिळत आहे. १७ ते २७ मार्च या कालावधीत पर्यटकांना शेतात येऊन स्वतःच्या पसंतीचे कलिंगड निवडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रति किलो ४५ रुपये दराने हे कलिंगड विकले जात असून, कुटुंबासह निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याची संधीही यातून मिळत आहे. त्यामुळे स्थानिकांसह बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढत आहे.

    आरोग्यासाठी उपयुक्त फळ

    या उपक्रमामागे शेतकऱ्यांची कल्पकता आणि ग्राहकांना थेट शेताशी जोडण्याचा उद्देश आहे. पारंपरिक पद्धतीने घाऊक विक्री करण्याऐवजी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळत आहे. त्याचबरोबर कृषी पर्यटनाला नवी दिशा मिळत आहे. पिवळ्या कलिंगडात बीटा-कॅरोटीनसारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात असल्याने ते आरोग्यासाठीही लाभदायक ठरते. त्यामुळे चव आणि आरोग्य या दोन्ही बाबतीत हे फळ ग्राहकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

    घोसाळे परिसरातील हा प्रयोग रायगड जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, भविष्यात अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे शेतीला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे. एकूणच, ‘आरोही’ पिवळ्या कलिंगडामुळे रायगडमध्ये कृषी पर्यटनाचा नवा अध्याय लिहिला जात आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा