• Tue. Jun 16th, 2026
    Rupali Chakankar: अंधारेंनी फोटो दाखवला, आता चाकणकरांनी सगळं सांगितलं; बोट कापल्याच्या आरोपावर बाजू मांडली, कडक इशाराही दिला!

    Rupali Chakankar Resigns: शुक्रवारी रुपाली चाकणकर यांनी ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे त्यांना स्पष्ट सांगितल्यामुळे चाकणकर यांनी हा निर्णय घेतला. शुक्रवारी रात्री त्यांनी पक्षाच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे सांगितले.

    रुपाली चाकणकरांनीही तंत्र-मंत्र विद्येचा वापर केला, पीडित महिलेनंच सांगितलं; फोटो दाखवत सुषमा अंधारेंचा गंभीर दावा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: भविष्यातील घटनांची भीती दाखवून महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी अखेर शुक्रवारी पदाचा राजीनामा दिला. या प्रकरणात राजीनामा देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. राजीनामा देताना रुपाली चाकणकर यांनी आपल्यावर झालेल्या विविध आरोपांवर स्पष्टीकरण दिलं असून निराधार आरोप करणाऱ्यांना नोटीस पाठवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

    तंत्र-मंत्र विद्येचा वापर करण्यासाठी रुपाली चाकणकर यांनी दोन वर्षांपूर्वी सोमवती अमावस्येला अनामिका (करंगळीशेजारील बोट) कापली होती, अशी माहिती मला मिळाली असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेतून केला होता. हा दावा खोडून काढत आता रुपाली चाकणकर यांनी आपली बाजू मांडली आहे. “काही लोक पत्रकार परिषदेतून सातत्याने चुकीच्या बातम्या पसरवत असून माझा एक फोटो दाखवत हा फोटो 2 सप्टेंबरचा असल्याचं सांगितलं. मात्र हा फोटो 12 सप्टेंबरचा असून त्या फोटोवरील 1 अंक खोडून फक्त 2 सप्टेंबर ही तारीख दाखवण्यात आली. 2 सप्टेंबरला मी अजितदादा यांच्या दौऱ्यात त्यांच्यासोबत होते. त्या दौऱ्यात असताना माझ्या हाताला कुठेही जखम नसून त्यानंतर 3 सप्टेंबर, 4 सप्टेंबरलाही मी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये होती, तेव्हाही माझ्या हाताला कुठेही जखम नव्हती. त्यामुळे असे आरोप करणाऱ्यांना आम्ही कायद्याच्या चौकटीतून नोटीस पाठवू,” असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे.

    ‘दुसरी बाजू माहिती नव्हती’

    “आपण काही लोकांवर विश्वास ठेवतो. आपली आध्यात्मिक श्रद्धा आणि भावना असते. माझे संपूर्ण कुटुंब वारकरी कुटुंब आहे. त्यामुळे आमची श्रद्धा आध्यात्मिक दृष्टिकोनातून होती. म्हणून आम्ही कुटुंब या देवस्थानाशी जोडलो होतो. त्याची दुसरी बाजू आम्हाला माहिती नव्हती. काही कार्यक्रमांच्या निमित्ताने काही कालावधी आम्ही तिथे राहायचो,” असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

    अशोक खरात याला अटक झाल्यापासून त्याचे चाकणकर यांच्याशी संबंध असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. चाकणकर यांनी स्वपक्षातीलही अनेकांचा रोष ओढवून घेतला होता. मात्र, चाकणकर यांनी खरात यांना ओळखत नसल्याचा दावा आधी केला होता. नंतर मात्र आध्यात्मिक गुरू म्हणून ओळख असल्याचे सांगितले होते. परंतु, जनमानसात तयार होत असलेल्या अस्वस्थतेमुळे तसेच विरोधकांच्या आरोपांमुळे दबाव वाढत असल्याचे पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी याविषयी चर्चा केली आणि चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा, असे सांगितले.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा