सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात सुरु असलेल्या घडामोडी चर्चेला कारण ठरताना दिसत आहेत. त्यामागे कारणही तसंच आहे. एकीकडे महायुतीच्या घटक पक्षांचे स्थानिक नेते एकमेकांवर निशाणा साधताना दिसत आहेत. तर दुसरीकडे वरिष्ठ पातळीवर फोर मोठ्या हालचाली घडल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सातारा-सांगलीच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सातारा : सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत अखेर महायुतीत एकमत झाल्याचं वृत्त समोर येत आहे. साताऱ्यात महायुतीमधील नेत्यांच्या वादाची इतिहासात नोंद व्हावी, अशा घटना गेल्या काही महिन्यांमध्ये घडल्या आहेत. महायुतीतला संघर्ष विधान परिषद निवडणुकीतही कायम बघायला मिळत होता. पण महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर सातारा-सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत एकमत होताना दिसत आहे. तीनही पक्षांच्या स्थानिक नेत्यांना जुळवून घेण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सातारा-सांगली विधान परिषदेचा महायुतीतला वाद अखेर थांबला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सातारा-सांगलीच्या जागेवरुन सुरु असलेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. या बैठकीनंतर स्थानिक नेत्यांना एकत्रित काम करण्याच्या सूचना महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्या आहेत, अशी माहिती समोर येत आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांकडून कुठेच क्रॉस व्होटींग होणार नाही याबाबतचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.
सातारा आणि सांगलीत महायुतीच्या घटक पक्षांची ताकद आहे. दोन्ही ठिकाणी महायुतीच्या पक्षांकडे सर्वाधिक जागा आहेत. पण स्थानिक महायुतीच्या नेत्यांमध्ये सुरु असलेल्या कुरबुरींमुळे कदाचित विधान परिषद निवडणुकीत फटका बसू शकतो. हा संभाव्य धोका लक्षात घेता महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातोय.
सातारा-सांगली विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. भाजप नेत्यांकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना विश्वासात घेतलं जात नाही, अशी खंत शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली होती. तसेच महायुतीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची अनुपस्थिती होती, असं देखील वृत्त समोर आलं होतं. त्यामुळे सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा उमेदवार जिंकणार की नाही? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात संघर्ष बघायला मिळाला. यावेळी पोलीस बळाचा वापर करुन झालेल्या धक्काबुक्कीत मंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला इजा झाली होती. तसेच मंत्री मकरंद पाटील यांनाही या धक्काबुक्कीत धक्का लागला होता. या घटनेचा वचपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते विधान परिषदेच्या निवडणुकीतून काढणार का? अशी देखील चर्चा आहे. या सर्व घडामोडींदरम्यान वरिष्ठ पातळीवर हालचाली घडल्याची माहिती मिळत आहे. वरिष्ठ पातळीवरुन सूचना मिळाल्या असल्या तरी स्थानिक पातळीवर काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा