• Sat. Jun 13th, 2026
    Ashok Kharat : ‘अशोक खरात सारख्या भोंदूंवर भर चौकात गोळ्या घालाव्यात’, कालीचरण महाराजांची प्रतिक्रिया

    कालीचरण महाराजांनी अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. अशोक खरात सारख्या भोंदू बाबांना आरोप सिद्ध झाल्यास भर चौकात गोळ्या घालाव्यात, अशी भूमिका कालीचरण महाराजांनी मांडली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    धाराशिव : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे. अशोक खरातच्या चौकशीसाठी विशेष SIT पथक स्थापन केलं आहे. या प्रकरणी काही पीडितांनी अशोक खरातच्या विरोधात तक्रार केली आहे. तसेच पोलीस प्रशासनाकडून इतर पीडितांनादेखील तक्रारीसाठी पुढे येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अशोक खरात हा किती विकृत होता याची संपूर्ण माहिती आता उघडकीस आली आहे. त्याचे आक्षेपार्ह व्हिडीओ देखील समोर आले आहेत. पोलिसांनी त्याला सिनेस्टाईल अटक केली. या अटकेनंतर त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. या दरम्यान, कालीचरण महाराजांनी अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अशोक खरात सारख्या भोंदूंवर आरोप सिद्ध झाले तर भर चौकात गोळ्या घालाव्यात, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

    कालीचरण महाराजांना पत्रकारांनी धर्माच्या नावाने पैशांचा बाजार सुरु असल्याबद्दल विचारलं. त्यावर त्यांनी “बाजार सगळीकडे आहे. वकील पैसे घेतात, डॉक्टर पैसे घेतात, मजूर पैसे घेतात. मग धर्माचे कार्य करणाऱ्यांनी पैसे घेऊ नये, असा काही नियम आहे का? धर्माचं कार्य करणाऱ्यांनाही मानधन दिलं जातं. त्यामध्ये दोष नाही. दोष तेव्हा निर्माण होतो जेव्हा लोकांना ठगलं जातं. जो लोकांना ठगतो तो नर्कात जाणार आहे. जे लोकं कूकर्म करत आहेत ते नरकात जाणार आहेत. त्यांना शासकीय दंडही मिळणार”, असं कालीचरण महाराज म्हणाले.

    आरोपीवर काय शिक्षा व्हावी?

    “स्वयंघोषित कोणताही महाराज नाही. लोकं त्यांना महाराज म्हणतात. कोणताच महाराज म्हणत नाही की मला महाराज म्हणा. लोकांनी महाराज केलेला आहे. लोकांनी पूजनीय पदावर बसवलं असेल आणि त्या पदावरुन दुरोपयोग होत असेल, कूकर्म होत असेल, किंवा धर्म कलंकीत केलं जात असेल तर ते लोकं महापापी आहेत. जे लोकं अशा कूकर्मात अडकले आहेत, त्यांचे गुन्हे सिद्ध होतात तर त्यांना भर चौकात गोळी मारली पाहिजे”, असा घणाघात कालीचरण महाराज यांनी केला.

    ‘साधू भ्रष्ट झाला तर राजा लोक ढुंकूनही पाहत नाहीत’

    “पैशांची लूटमार, भीती दाखवून लुटणे असेल, लैंगिक शोषण, अत्याचार असेल हे कूकर्म आहेत. त्यांना नरकात भोगावं लागेल आणि राजाकडूनही दंड मिळेल”, असं कालीचरण महाराज म्हणाले. “जे प्रतिष्ठित साधू, संत आहेत, ज्यांमागे खूप मोठा जनसमुदाय आहे. अशा साधूच्या मागे लागलो तर त्यांचे शिष्य आपल्याला मतदान करतील, असं राजा लोकांना वाटतं. राजाची ही सामान्य इच्छा आहे. प्रत्येक सामान्य राजाला असं वाटतं. अशा साधू लोकांना राजा लोक सन्मान देतात. पण तो भ्रष्ट निघाला तर राजा लोक त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत”, अशी प्रतिक्रिया कालीचरण महाराजांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा