मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पेणमधील आंबिवली गावच्या हद्दीत कारने दुचाकीला चिरडले आहे. ही घटना गुढीपाडव्याच्या दिवशी घडली आहे.
नेमकं काय घडलं?
दि. १८ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास आंबिवली गावाच्या हद्दीत नवीन साई सहारा हॉटेलसमोर हा अपघात घडला. अक्षत बाबूलाल राठोर (वय ३५, रा. जेएनपीटी टाउनशिप, उरण) हा त्याच्या ताब्यातील एक्सएल ६ कारने पेणहून पनवेलकडे जात असताना अतिवेगात वळण घेत होता. वेगावर नियंत्रण सुटल्याने त्याने निष्काळजीपणे वाहन चालवत उजव्या बाजूने जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार शुभम देविदास पाटील (वय २७, रा. आंबिवली, ता. पेण) गंभीर जखमी झाला.
गंभीर दुखापत
या अपघातात शुभमच्या डोक्याला तसेच हातापायांना गंभीर दुखापती झाल्या. तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र मृत्यूशी झुंज देताना अखेर गुढीपाडव्याच्या दिवशी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका क्षणाच्या चुकीमुळे एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
Pune Crime : ‘वस्तीत का फिरता?’ किरकोळ वादाचा राग, कोयता गँगकडून कुटुंबावर हल्ला; पाच जणांना अटक
गुन्हा दाखल
या प्रकरणी दादर सागरी पोलीस ठाण्यात गु.रजि.नं. ११/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी म्हणून पोलीस उपनिरीक्षक अनिल शंकर पाटील यांनी तक्रार नोंदवली असून पुढील तपास सुरू आहे. अशी माहिती दादर पोलिसांनी आज सायंकाळी दिली आहे.
वेगावर नियंत्रण आवश्यक
दरम्यान, मुंबई–गोवा महामार्गावरील वाढते अपघात आणि बेदरकार वाहनचालकांचा कहर यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई आणि वेगावर नियंत्रण आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.
