• Sat. Jun 6th, 2026
    Nanded News : ईदचं नमाज पठण सुरु होतं, दुचाकीसह तरुण जिवंत जळाला, वाजेगाव बंधाऱ्यावर काय घडलं? एटीएसकडून तपास सुरू

    नांदेड शहराजवळच्या वाजेगाव बंधाऱ्यावर आज सकाळी एक व्यक्ती दुचाकीसह जळाला, उपचारापूर्वीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    दुचाकीसह जिवंत तरुण जळाला, वाजेगाव बंधाऱ्यावर घडलं तरी काय?(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड शहराजवळ असलेल्या वाजेगाव बंधाऱ्यावर आज सकाळी एक अंगावर शहारे आणणारी घटना घडली. एका व्यक्तीचा आपल्या दुचाकीसह जळून अत्यंत भीषण मृत्यू झाला आहे. या घटनेवेळी झालेल्या गूढ स्फोटांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून एटीएस ( ATS ) आणि फॉरेन्सिक लॅबने तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत.

    नेमकी घटना काय?

    सकाळी ईदनिमित्त शहरातील मुख्य ईदगाह मैदानावर अनेक मुस्लीम बांधव नमाजसाठी जमले होते. या ठिकाणापासून काही अंतरावरच असलेल्या वाजेगाव बंधारा परिसरात ९:३० च्या सुमारास एक दुचाकीस्वार अचानक आगीच्या भडक्यात अडकला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ती व्यक्ती आणि दुचाकी जळत असताना अंगातून आणि गाडीतून मोठ्या स्फोटांचे आवाज येत होते. हे स्फोट नेमके कशाचे होते, याबाबत अद्याप संभ्रम आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली, मात्र उपचारापूर्वीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

    एटीएस आणि फॉरेन्सिक कडून कसून तपास

    या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी पोलिसांना काही संशयास्पद साहित्य मिळाले असून ते तातडीने फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आले आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथक (ATS) देखील या प्रकरणाचा समांतर तपास करत आहे. तो व्यक्ती कोणत्या संघटनेचा होता का? त्याचा हेतू काय होता? आणि स्फोटके असतील तर ती कोठून आली? या सर्व अँगलने तपास सुरू असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी सांगितले.

    Maharashtra TimesAshok Kharat : भोंदूबाबा खरातविरुद्ध आणखी तीन महिला पुढे आल्या, लॅपटॉप, CCTV ते CDR; SIT कडून सखोल चौकशी सुरू

    मृताची ओळख पटली

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीची ओळख पटली आहे. मात्र, तपासाच्या गोपनीयतेसाठी सध्या नाव जाहीर करण्यात आलेले नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांची विविध पथके तपासासाठी रवाना झाली आहेत. घटनास्थळावरील पुराव्यांवरून काही ठोस निष्कर्ष हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलीस प्रशासनाचे आवाहन

    या घटनेनंतर शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. “काही लोक जाणीवपूर्वक सोशल मीडियावरून अफवा पसरवत आहेत. नागरिकांनी कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. तपासातून जो काही निष्कर्ष निघेल, तो अधिकृतपणे समोर आणला जाईल,” असे आवाहन सूरज गुरव यांनी केले आहे. सध्या संपूर्ण नांदेड जिल्ह्याचे लक्ष या तपासाकडे लागले असून, या भीषण मृत्यूमागचे गूढ कधी उकलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा