• Sat. Jun 6th, 2026
    ‘त्या’ संस्थेसाठी मविआ सरकारच्या काळात पाणी आरक्षित? Uddhav Thackeray म्हणाले, ‘खरात प्रकरणात ‘पाणी’ कुठवर मुरलं आहे, चौकशी करा’

    रुपाली चाकणकरांचा राजीनामा झाल्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी या सर्व प्रकरणावर भाष्य केलं आहे. ते आज मुंबईत एक्सपोर्ट इम्पोर्ट लॉजिस्टिक कोर्सचा शुभारंभ केला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

    उद्धव ठाकरेंचं अशोक खरात प्रकरणावर भाष्य(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. श्रद्धा, तंत्र-मंत्र आणि सत्तेच्या वर्तुळातील कथित संबंध यामुळे हे प्रकरण अधिकच गडद झाले आहे. एका महिलेच्या तक्रारीनंतर अटक झालेल्या खरातवर गंभीर आरोप असून व्हायरल व्हिडिओमुळे संताप वाढला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी भोंदूगिरीवर घणाघात करत सरकारलाही कठोर कारवाईचे आवाहन केले आहे. “ज्या नेत्यांकडे स्वतःचे कर्तृत्व नसते, त्यांनाच अशा भोंदूगिरीचा आसरा घ्यावा लागतो,” अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    जादूटोणा विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा

    पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा वारसा आहे. राज्यात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असतानाही राजकीय नेते अशा प्रकरणांत गुंतलेले आढळणे दुर्दैवी आहे. या कायद्याची अत्यंत कठोरतेने अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. जे नेते अशा मार्गांचा अवलंब करतात, ते मुळात भाकड आणि भोंदू आहेत, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

    “पाणी नेमके कुठे मुरले आहे ते जनतेला समजू द्या”

    महाविकास आघाडी सरकारच्या काळात दारणा धरणातून एका विशिष्ट संस्थेसाठी पाणी आरक्षित केल्याच्या आरोपावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. “या प्रकरणाची सखोल चौकशी करा, पाणी नेमके कुठे मुरले आहे ते जनतेला समजू द्या. जो कोणी दोषी असेल, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे,” असे आव्हान त्यांनी सरकारला दिले.

    Maharashtra TimesSanjay Shirsat : ‘समोरच्याचं पाप कपाळावर नसतं; आता नेत्यांनी बुरखा घालून फिरायचं का?’ खरात प्रकरणावर संजय शिरसाटांचा सवाल

    सरकारवर आरोप

    अधिवेशनातील कामकाजावर भाष्य करताना ठाकरे म्हणाले की, विरोधी पक्षाने भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे पुराव्यानिशी बाहेर काढली आहेत. मात्र, मुख्यमंत्री सर्व प्रकरणांवर पांघरून घालत आहेत. “मुख्यमंत्र्यांनी आता ‘पांघरून मंत्रालय’ स्थापन करून ते खाते स्वतःकडेच ठेवावे,” असा टोला त्यांनी लगावला. गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने अशा भोंदू बाबांवर आणि त्यांच्याकडे जाणाऱ्या नेत्यांवर ‘ओम फट स्वाहा’ म्हणत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

    काय आहे नेमकं प्रकरण?

    अशोक खरात उर्फ कॅप्टन या व्यक्तीने श्रद्धेच्या नावाखाली राज्यातील अनेक बड्या नेत्यांशी आपले संबंध असल्याचे सांगत खळबळजनक कृत्ये केली आहेत. त्याच्या विरोधात एका महिलेने अत्याचाराचा गुन्हा नोंदवला आहे. त्यानंतर या भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे. या महिलेवरील अत्याचाराचा व्हिडिओही सध्या सोशल माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या सर्व प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, यात पैशांचे व्यवहार आणि कथित तंत्र-मंत्राचा वापर झाल्याचे आरोप आहेत. दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, कारण की त्यांचा आणि या भोंदू बाबाचा संबंध होता. अशोक खरात हा रुपाली चाकणकर यांचा आणि कुटुंबियांचा गुरु आहे. त्याशिवाय चाकणकर आणि एका संस्थेच्या कमिटीवरही त्या सदस्य होत्या. त्यामुळे आता या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण मिळाले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा