• Sat. Jun 13th, 2026
    Pune Nashik Railway: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे ‘हायव्होल्टेज’ पेचात; ‘महारेल’कडून 685 कोटी परत घेण्याची प्रक्रिया सुरु

    Pune-Nashik Semi High Speed ​​Rail Project: उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

    पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे हायव्होल्टेज पेचात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: गेल्या अनेक वर्षांपासून विकासाचे स्वप्न दाखवणार्‍या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे भविष्य आता अंधारात सापडले आहे. नारायणगावजवळील खोडद येथील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’च्या (जीएमआरटी) तांत्रिक अडचणींमुळे या प्रकल्पाचे ‘सिग्नल’ लाल झाले असून, राज्य सरकारने या प्रकल्पासाठी दिलेला सुमारे ६८५ कोटींचा निधी ‘महारेल’कडून परत घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

    ‘जीएमआरटी’चे ग्रहण
    पुणे-नाशिक रेल्वे मार्गिका नारायणगाव येथील जीएमआरटी वेधशाळेच्या ‘बफर झोन’मधून जात आहे. रेल्वेच्या विद्युतीकरणामुळे आणि हायस्पीड वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या लहरींचा फटका वेधशाळेच्या अ‍ॅन्टेनांना बसू शकतो, असा आक्षेप ‘नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ने घेतला आहे. परिणामी, रेल्वे बोर्डाने यापूर्वी दिलेली प्राथमिक मान्यता मागे घेतली आहे.

    Maharashtra TimesPune Friends Accident : लेह लडाखहून येताना अपघात, तिघा मित्रांवर ऐन गुढीपाडव्याला अंत्यसंस्कार, पिंपरी हळहळली, नेत्यांनाही भावना अनावर
    तज्ज्ञ समितीवर भिस्त
    विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, या केंद्र सरकारमार्फत तज्ज्ञ समिती नियुक्त केली जाणार आहे. ही समिती जीएमआरटीचे अ‍ॅन्टेना आणि रेल्वे मार्गिका यांच्यातील तांत्रिक समन्वयाचा अभ्यास करेल. या समितीचा अहवालच आता या रेल्वेचे भवितव्य ठरवणार आहे.

    निधीची ‘घरवापसी’ आणि वाढता खर्च
    राज्य सरकारने या प्रकल्पासाठी महारेलला १ हजार कोटी ६२ लाख वितरित केले होते. त्यापैकी ६८४ कोटी ६२ लाख परत घेण्याची कार्यवाही सुरू आहे. दुसरीकडे विलंबामुळे प्रकल्पाचा खर्च आता १७ हजार ८८९ कोटी २८ लाखांच्या घरात पोहोचला आहे.

    Maharashtra TimesBaramati Crime : भरदिवसा फिल्मी स्टाईल मारहाण, पैशांच्या वादातून पाच जणांचा हल्ला, बारामतीतील थरार सीसीटीव्हीत कैद
    महत्त्वाचे बदल आणि सद्यःस्थिती

    संस्थेत बदल : हा प्रकल्प आता ‘महारेल’ऐवजी मध्य रेल्वेमार्फत राबवणार.
    भूसंपादन : आतापर्यंत ९९.१८ हेक्टर जमिनीचे संपादन झाले असून, पुणे, संगमनेर आणि सिन्नर भागात मोबदला वाटप.
    स्थानिक विरोध : मार्ग बदलल्यास अनेक गावे रेल्वेपासून वंचित राहतील, या भीतीपोटी जुनाच मार्ग कायम ठेवण्यासाठी आंदोलने सुरू आहेत.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा