• Tue. Jun 16th, 2026

    आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचरांच्या मानधनात दुप्पट वाढ -आरोग्यमंत्र्यांचा महत्वपूर्ण निर्णय – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 18, 2026
    आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचरांच्या मानधनात दुप्पट वाढ -आरोग्यमंत्र्यांचा महत्वपूर्ण निर्णय – महासंवाद

    मुंबई दि. १८ : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य उपकेंद्रामध्ये कार्यरत असलेल्या अंशकालीन स्त्री परिचरांच्या मासिक मानधनात दुप्पट वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. १ एप्रिल २०२६ पासून  मानधनात  वाढ करण्यात येणार असून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

    आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचर गाव पातळीवर, आदिवासी , दुर्गम, डोंगराळ भागात प्राथमिक स्वरुपाच्या आरोग्य सेवा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतात. तसेच आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्यविषयक कार्यक्रमांचा लाभ प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्यातही स्त्री परिचर महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यांच्या कामाचे स्वरुप पाहता त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी लोकप्रतिनिधी व संघटनाकडूनही होत होती. अंशकालीन स्त्री परिचरांना  2019 च्या शासन निर्णयानुसार दरमहा तीन हजार रुपये मानधन अदा करण्यात येत होते. स्त्री परिचरांच्या कामाचे बदलते स्वरूप, आरोग्य सेवेतील वाढती भूमिका आणि वाढत्या महागाईचा विचार करता आरोग्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन स्त्री परिचरांच्या मासिक मानधनात तीन हजार रुपये वाढ केली असून आता त्यांना सध्याचे तीन हजार आणि प्रस्तावित वाढ तीन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये मासिक मानधन १ एप्रिल २०२६ पासून देण्यात येणार आहे.

    सर्व जिल्हा परिषदांनी अंशकालीन स्त्री परिचरांना प्रचलित कार्यपद्धतीनुसार सुधारित मासिक मानधन देण्याची कार्यवाही करावी. तसेच दरमहा दहा तारखेपर्यंत मासिक मानधनाची रक्कम अदा करण्याची कार्यवाही करावी. याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकताच प्रसिद्ध केला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील अंशकालीन स्त्री परिचरांकडून समाधान व्यक्त होत आहे.

    00000

    दत्तात्रय कोकरे/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed