• Thu. Sep 17th, 2026

Pune Metro: पुणेकरांकडून गणेशोत्सवात तुफान गर्दी; मेट्रोकडून आता विशेष वेळापत्रक, रात्री किती वाजेपर्यंत धावणार गाड्या?

म. टा. प्रतिनिधी, पुणे: लहान-थोर ज्याची आतुरतेने वाट पाहत होते त्या गजाननाचे सोमवारी दिमाखात आगमन झाले. आसमंतात दुपारी सप्तरंगांची उधळण आणि सायंकाळी पावसाच्या सरीने गणपतीचे स्वागत केले. मांगल्याचे प्रतीक अन् बुद्धीची देवता असलेल्या मंगलमूर्ती गणरायाच्या आगमनाने सगळीकडे चैतन्य पसरले आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांच्या उत्सवाला सुरुवात झाल्याने पुढील अकरा दिवस उत्साहाचे आणि भारावलेले असतील. गणपतीबाप्पाच्या आगमनाच्या दिवशी मेट्रोला प्रवाशांकडून तुफान प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. रात्री सातपर्यंत एक लाख ९५ हजार प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला. मंडई मेट्रो स्थानकातून सर्वाधिक ३२ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मेट्रोची प्रवासीसंख्या वाढणार असल्याचे गृहीत धरून ‘महामेट्रो’कडून नियोजन करण्यात आले आहे. बाप्पाच्या आगमनाच्या दिवशीच शहराच्या मध्यवस्तीमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे मेट्रोला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. नागरिकांनी मध्यवस्तीमध्ये खरेदी, बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे मंडई मेट्रो स्थानकाचा वापर सर्वाधिक झाल्याचे दिसून आले. मंडई स्थानकात गर्दी झाल्यानंतर प्रवाशांना दुसरी मेट्रो येईपर्यंत थांबवून ठेवले जात होते. गर्दीमुळे दर पाच मिनिटांला मेट्रो सोडण्यात येत होती. रात्री सातपर्यंत एक लाख ९५ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याचे दिसून आले. त्यानंतर पीसीएमसी येथून २१ हजार, तर रामवाडी येथून १९ हजार प्रवाशांनी प्रवास केला.

कसं आहे मेट्रो प्रशासनाचे नियोजन?

गणेशोत्सवाच्या कालावधीत पुण्यात १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान गर्दीच्या वेळेत पाच मिनिटांच्या अंतराने मेट्रो फेऱ्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान मेट्रोची सेवा मध्यरात्री दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर २५ सप्टेंबर सकाळी सहा ते २६ सप्टेंबर रात्री ११ वाजेपर्यंत तब्बल ४१ तास मेट्रो सेवा अखंडित सुरू राहणार आहे. गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या टप्प्यात १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान मेट्रोची नियमित सेवा सकाळी सहा ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहील. त्यानंतर १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान विशेष वेळापत्रक लागू करण्यात येणार असून, या काळात सकाळी सहा ते मध्यरात्री दोनपर्यंत मेट्रो धावेल. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत गणपती व देखावे पाहण्यासाठी येणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुण्यात गणरायाचे दिमाखात आगमन

पुण्याच्या वैभवशाली आणि चैतन्यदायी गणेशोत्सवाला सोमवारी उत्साहात सुरुवात झाली. घरगुती गणपतीची सकाळी उत्साहात प्राणप्रतिष्ठा झाली. श्री कसबा, श्री तांबडी जोगेश्वरी, श्री गुरुजी तालीम, श्री तुळशीबाग, श्री केसरीवाडा या मानाच्या गणपतीसह अखिल मंडई मंडळाचा शारदा गजानन, श्रीमंत दगडूशेठ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती; तसेच शेकडो सार्वजनिक मंडळांच्या गणपतीचे जल्लोषात आगमन झाले. गणपतीच्या स्वागताच्या पारंपरिक मिरवणुकीने मध्यवर्ती पेठा गणेशमय झाल्या होत्या. मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या. स्वागत कमानी लक्ष वेधून घेत होत्या. गणेशभक्तांकडून चौकाचौकांत मिरवणूक रथावर फुलांची उधळण होत होती.

सायंकाळी अनेकांची पावले मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी वळली. त्यामुळे मध्यवर्ती पेठांमध्ये सायंकाळनंतर गर्दी झाली होती. उपनगरातील मंडळाच्या मिरवणुका रात्रीपर्यंत सुरू होत्या. दरम्यान, दीड दिवसाच्या गणपतीचे आज, मंगळवारी विसर्जन होणार आहे.

दरम्यान, यंदाचा गणेशोत्सव बारा दिवसांचा आहे. गणपतीच्या आगमनानंतर आज, मंगळवारी ऋषीपंचमी साजरी होणार आहे. येत्या, गुरुवारी गौरींचे आगमन होणार आहे. शुक्रवारी गौरीपूजन असून, शनिवारी गौरींचे विसर्जन होईल. गणपतीच्या आगमनानंतर आता गौरींच्या आगमनाचे वेध लागले आहेत.

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed