• Wed. Mar 18th, 2026
    बड्या नेत्यांचं भविष्य सांगणाऱ्या अशोक खरातला अटक, महिलेवर अत्याचाराचा आरोप, पेन ड्राईव्हमध्ये 58 आक्षेपार्ह व्हिडिओ

    Nashik Astrologer Ashok Kharat Arrest : नाशिकमधील सरकारवाडा पोलिसांत ज्योतिषी अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    अशोक खरात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नाशिक : बड्या राजकीय नेत्यांचे भविष्य सांगणारा आणि स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणविणारा स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याला नाशिक पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ज्योतिष व्यवसायातून त्याने अनेकांना गंडा घातल्याचा आरोप असून, त्याच्याकडून जप्त केलेल्या पेन ड्राइव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ आढळले आहेत. गुन्हे शाखेने खरातला अटक केली असून, या प्रकाराने हायप्रोफाइल वर्तुळात खळबळ उडाली आहे.

    काय आहे प्रकरण?

    नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत संशयित अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार १८ मार्च रोजी खरात याला पहाटे ३ वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. यासंदर्भात सध्या अधिक चौकशी सुरु आहे. धक्कादायक म्हणजे त्याच्याकडून जप्त केलेल्या पेन ड्राइव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ असून, त्याची सत्यता पडताळण्यात येत आहे.

    कोण आहे अशोक खरात?

    नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. नोव्हेंबर २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगाव येथील मंदिरात भेट दिल्यानंतर अशोक खरात चर्चेत आला होता. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जात असतात. त्याचं खरं रुप समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा