Nashik Tapovan: नाशिकमधील तपोवन परिसरातील बाभळीच्या झाडाला काही व्यक्तींचे फोटो, काळ्या बाहुल्या, खिळे ठोकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
तपोवन परिसर धार्मिक आणि नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. मात्र, येथील झाडांवर काही व्यक्तींची छायाचित्रे आणि काळ्या बाहुल्या खिळे ठोकून लावण्यात आल्याचा प्रकार ‘खिळेमुक्त वृक्ष अभियान’चे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. खिळे ठोकल्यामुळे झाडांच्या उतींचे नुकसान होते, ज्यामुळे झाड आतून पोकळ होऊन मृत होऊ शकते. त्यामुळे झाडांना हानी पोहोचवण्यासह समाजात अशा अघोरी कृत्यांच्या माध्यमातून भीतीचे वातावरण निर्माण करण्यात येत असल्याचा आरोपही पर्यावरणप्रेमींनी केला आहे. महापालिका व पोलिसांनी दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही केली आहे.
Crime News : कोणाला वाईट मेसेज गेले असल्यास माफ करा, इन्स्टावर स्टेटस, विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं
‘पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह’ तपोवन परिसरात प्रस्तावित वृक्षतोडीपूर्वी नाशिक महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात आले होते. जर हे सर्वेक्षण प्रामाणिकपणे झाले असेल, तर अधिकाऱ्यांना ही खिळे ठोकलेली झाडे का दिसली नाहीत, असा सवाल कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. सर्वेक्षणादरम्यान या बाबी दुर्लक्षित राहिल्या असतील, तर महापालिकेच्या कार्यपद्धतीवर आणि पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते, असेही त्यांनी अधोरेखित केले आहे.
Nashik News : नाशिकमध्ये टोळीयुद्धाचा भडका? हनुमानवाडी परिसरात टोळक्याकडून हल्ला, अनेक वाहनांची तोडफोड
झाडांना खिळे ठोकणे हे केवळ निसर्गाविरुद्धचे क्रौर्य नसून, ते सुसंस्कृत समाजाला लागलेली अंधश्रद्धेची कीड आहे. जबाबदार अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करणे अधिक चिंताजनक आहे. आम्ही दोषींवर तत्काळ कठोर कारवाईची मागणी करीत आहोत. – अमित कुलकर्णी, अध्यक्ष, खिळेमुक्त वृक्ष अभियान
