Dr Manisha Jejurkar Death Case : डॉ. मनीषा यांचे पती डॉ. निलेश जेजुरकर हे घरात असताना मनीषा यांनी जीव दिलाच कसा? असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला
कुटुंबाचं म्हणणं काय?
डॉ. मनीषा यांचे पती डॉ. निलेश जेजुरकर हे घरात असताना मनीषा यांनी जीव दिलाच कसा? असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला आहे. या प्रकरणात फरार असलेल्या आरोपींना जामीन मंजूर करु नये, तसेच पोलिसांकडून देखील जो तपास सुरू आहे त्यावर आम्हाला संशय असल्याचं फिर्यादी यांचे वकील ॲड. जयदीप वैशंपायन यांनी म्हटले आहे.
डॉ. मनीषा जेजुरकर यांनी जीव दिल्यानंतर त्यांच्या कुटुंबाकडून देखील अनेक आरोप करण्यात आले होते. या संदर्भात पोलिसांकडून अद्याप तपास सुरू आहे. संशयित डॉ. निलेश जेजुरकर हे अद्याप फरार असून, पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणी पोलीस तपासात काय निष्पन्न होतं हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
डॉ. नीलेश जेजुरकर हे अनेक वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. हजारो रुग्णांना नैराश्यातून बाहेर काढणाऱ्या आणि मानसिक व्याधींवर मात करायला शिकवणाऱ्या तज्ञाच्याच पत्नीनेच इतकं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
डॉक्टर महिलेशी जवळीक
डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, “गंगापूर रोड येथील संशयित डॉ. निलेश जेजुरकर यांची २०२१ पासून ए. एच. ओ. डी. असलेल्या डॉक्टर महिलेसोबत जवळीक आहे. घरातील बारीक सारीक गोष्टी सांगून, तिच्याप्रमाणे घरात वागून, डॉ. मनिषा यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करुन ते पत्नीला मानसिक त्रास देत आणि त्यांनी जीव देण्यास प्रवृत्त केले” असे तक्रारीत नोंदवण्यात आले होते. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणांत पोलिस तपासात काय समोर येते हे बघणे महत्त्वाचे आहे.
