Mumbai Local Death: मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानकात एक धक्कादायक घटना घडली आहे. सततच्या भांडणामुळे माहेरी निघालेल्या पत्नीला थांबवून तिने घटस्फोटाची मागणी करताच तिला पतीने लोकलसमोर ढकललं. यावेळी महिलेचा जागीच मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं?
राजू गुप्ता हा पत्नी पुष्पा आणि दोन मुलांसह मुलुंड पश्चिमेतील रामगड येथे राहत होता. राजू आणि पुष्पा यांच्यात सातत्याने भांडणे होत. भांडणामुळे पुष्पाने स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल केली होती. रोजच्या वादाला कंटाळून काही दिवस पुष्पा माहेरी, उत्तर प्रदेश येथे गेली होती. बहिणीच्या संसारात होणारा वाद मिटवण्यासाठी सैन्यात जवान असलेला कमलेश कुमार याने मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली. कमलेश हा १४ मार्च रोजी बहीण पुष्पा आणि मुलाला घेऊन मुलुंड येथील घरी आला. दरम्यान, पुष्पा आणि राजू यांच्यात पुन्हा वाद झाला. वाद मिटत नसल्याने कमलेशच्या सल्ल्यानुसार पुष्पाने मुलुंड पोलिस ठाण्यात दुसरी तक्रार नोंदवली. त्यानंतर त्यांनी घरी न जाता कळव्याला नातेवाईकांकडे जाण्यासाठी मुलुंड ते कळवा असे तिकीट घेतले.
भावाला घरात कोंडून राजू स्थानकावर
कमलेशचे ओळखपत्र आणि एटीएम कार्ड घरातच राहिल्याचे लक्षात आले. त्याने राजूला फोन केल्यावर ते घरातच असल्याचे सांगितले. त्यामुळे पुष्पाला मुलुंड स्थानकात उभे करून कमलेश मोठ्या मुलासह घरी आला. घरी आल्यावर राजू आणि कमलेश यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात राजूने आपल्या धाकट्या मुलाला बाहेर काढत कमलेशला घरात कोंडून ठेवले. राजू आणि त्याचा लहान मुलगा मुलुंड स्थानकातील फलाट क्रमांक एकवर पोहोचले. राजूने पुष्पाची घरी येण्यासाठी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र रोजच्या वादाला कंटाळून पुष्पाने घटस्फोट घेण्याची मागणी केली. वादावादीनंतर राजूने पुष्पाला धावत्या लोकलसमोर ढकलले. लोकलखाली सापडल्याने पुष्पाचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना शनिवारी, सकाळी 10.45 दरम्यान घडली होती. महिलेला या घटनेनंतर तातडीने उपचारासाठी मुलुंड येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत घोषित करण्यात आलं.
