• Fri. Aug 28th, 2026

अमराळेच्या दळणवळणाला नवी दिशा; ७ कोटीच्या पुलामुळे मुख्य रस्त्याशी थेट कनेक्टिव्हिटी– पालकमंत्री जयकुमार रावल – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 28, 2026

धुळे, दि.२: शिंदखेडा तालुक्यातील अमराळे गावाला मुख्य रस्त्याशी थेट जोडण्यासाठी ७ कोटी २० लाख रुपये खर्च करून उभारण्यात येणारा पूल गावाच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या पुलामुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेगवान होणार असून, पुलाचे काम येत्या ९ ते १२ महिन्यांत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

अमराळे, ता. शिंदखेडा येथे उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्री श्री. रावल बोलत होते. यावेळी दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, सरपंच कविता मोरे, उपसरपंच कोकिळाबाई सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भूपेंद्र गिरासे, राजेंद्र देसले, वीरेंद्र गिरासे, डॉ. भरत गिरासे, दरबार गिरासे, रवींद्र देसले, डॉ. भरत बोरसे, जयवंत बोरसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, उपअभियंता ए. बी. पवार, उपअभियंता जी. डी. शिंदे, शाखा अभियंता शुभम राजपूत, हेमंत गोसावी यांच्यासह ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. रावल म्हणाले की, अमराळे गावाने नेहमीच प्रेम, विश्वास आणि उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. लोकांचा विश्वास आणि सहकार्य ही विकासाची खरी ताकद आहे. या गावाच्या विकासासाठी विविध कामांना सातत्याने चालना देण्यात आली असून, गावाला मुख्य रस्त्याशी जोडणारा हा पूल त्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. केवळ एका गावासाठी एवढ्या मोठ्या निधीचे काम मंजूर करून घेणे सोपे नव्हते. मात्र ग्रामस्थांचा पाठिंबा आणि शासनाच्या सहकार्यामुळे ७ कोटी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध होऊ शकला.

हा पूल पूर्ण झाल्यानंतर अमराळे गाव थेट मुख्य रस्त्याशी जोडले जाईल. शिंदखेडा-चिमठाणे मार्ग, बाम्हणे फाटा तसेच परिसरातील अन्य गावांकडे जाण्यासाठी नागरिकांना अधिक सुलभ पर्याय उपलब्ध होईल. सध्या काही ठिकाणी वळसा घालून करावा लागणारा प्रवास पुलामुळे अवघ्या काही मिनिटांत पूर्ण करता येईल. त्यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होण्याबरोबरच गावाच्या दळणवळणाला आणि पर्यायाने विकासाला मोठी चालना मिळेल.

सुमारे १४ फूट उंचीच्या या पुलामुळे पावसाळ्यात नदी-नाल्याला अचानक पाणी आल्याने निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या अडचणींवरही कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. पावसाळ्यात अचानक पाण्याची पातळी वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. दुचाकी किंवा नागरिक वाहून जाण्यासारख्या दुर्घटनांचा धोका लक्षात घेता भविष्यातील गरजांचा विचार करून सुरक्षित आणि सक्षम पूल उभारण्यात येत आहे. विकसित भारताच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देताना ग्रामीण भागात दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रावणाच्या पवित्र महिन्यात महादेव मंदिराच्या साक्षीने या महत्त्वाच्या कामाचे भूमिपूजन होत असल्याचा विशेष आनंद असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. रावल म्हणाले की, पुलाचे काम येत्या ९ ते १२ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मात्र काम केवळ वेगाने पूर्ण करणे पुरेसे नाही; त्याचा दर्जाही उत्कृष्ट असला पाहिजे. बांधकामातील काँक्रिट, क्युरिंग आणि अन्य सर्व तांत्रिक बाबी निर्धारित निकषांनुसार पूर्ण कराव्यात. ग्रामस्थांनीही या कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष ठेवावे आणि काम वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित यंत्रणा व कंत्राटदाराला आवश्यक सहकार्य करावे. अमराळे हे सुसंस्कृत आणि विकासाला साथ देणारे गाव असून, या पुलाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मतदारसंघातील विकासकामांचा उल्लेख करताना श्री. रावल म्हणाले की, गेल्या ७५ वर्षांत जी विकासकामे होऊ शकली नाहीत, ती गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर मार्गी लावण्यात आली आहेत. सुमारे साडेसात लाख कोटी रुपयांची विकासकामे पूर्णत्वास नेण्यात आली असून मतदारसंघाच्या विकासालाही वेग आला आहे. रस्ते, पूल आणि अन्य मूलभूत पायाभूत सुविधांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचे दळणवळण मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.

राज्याच्या पणन क्षेत्रालाही नवी दिशा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. रावल म्हणाले की, महाराष्ट्राचे नाव जागतिक स्तरावर अधोरेखित होईल, अशी जगातील सर्वात मोठी बाजार समिती उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी वाढवण बंदराजवळ सुमारे १३०० ते १४०० एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या परिसराला बंदर, विमानतळ, बुलेट ट्रेन तसेच मुंबई-दिल्ली महामार्गासारख्या महत्त्वाच्या दळणवळण सुविधांचा लाभ मिळणार असल्याने या प्रकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.

या बाजार समितीचे महत्त्व केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहणार नसून देशातील सुमारे ७० कोटी लोकांच्या जीवनाशी आणि अर्थव्यवस्थेशी हा प्रकल्प जोडला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेला तसेच देशाची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरच्या दिशेने नेण्याच्या प्रयत्नांना या प्रकल्पातून मोठे बळ मिळेल. या विकासाच्या वाटचालीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभत असल्याचे पालकमंत्री श्री. रावल यांनी सांगितले.

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा उल्लेख करताना श्री. रावल म्हणाले की, महायुती सरकारने राज्यातील भगिनींसाठी सुरू केलेली ही योजना सातत्याने सुरू असून यापुढेही सुरू राहणार आहे. दोन दिवसांपूर्वीच पात्र भगिनींच्या खात्यात योजनेची रक्कम जमा करण्यात आली आहे. महिलांना आर्थिक आधार देऊन त्यांच्या जीवनात सुरक्षितता आणि स्थैर्य निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

रस्ते, पूल, बाजार व्यवस्था आणि अन्य पायाभूत सुविधांच्या निर्मितीसोबतच महिला, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सर्वांगीण विकास साधण्यावर शासनाचा भर आहे. अमराळे ग्रामस्थांनी आजवर दिलेले प्रेम, विश्वास आणि सहकार्य यापुढेही कायम राहील, असा विश्वासही पालकमंत्री श्री. रावल यांनी यावेळी व्यक्त केला.

दृष्टिक्षेपात : अमराळे पूल

  • कामाचे नाव : तावखेडा–नवे सुकवद–दसवले–होळ–खलाणे–दलवाडे–अमराळे रस्ता, प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ७५ वरील कि.मी. २६/०० येथे मोठा पूल व जोडरस्त्याचे बांधकाम
  • तालुका व जिल्हा : शिंदखेडा, जि. धुळे
  • प्रशासकीय मान्यता : ₹७ कोटी ५० लाख (मार्च २०२६ अर्थसंकल्प)
  • तांत्रिक मान्यता : ₹७ कोटी १८ लाख ४५ हजार ५२९
  • निविदा रक्कम : ₹६ कोटी ३ लाख ८१ हजार ५६६
  • पुलाचा प्रकार : प्रबलित सिमेंट काँक्रीटचा घनफलक पूल
  • पुलाची लांबी : १४० मीटर
  • पुलाची रुंदी : १० मीटर
  • गाळे : प्रत्येकी १० मीटरचे १४ गाळे
  • तिरपेपणाचा कोन : ३० अंश
  • कंत्राटदार : श्री. अमृत डी. पाटील, धुळे

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed