• Fri. Aug 28th, 2026

जिल्ह्यातील रस्ते, पूल व शासकीय इमारतींच्या कामांना गती देणार- मंत्री शिवेंद्रराजे भोसले – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 28, 2026

भंडारा, दि.२८:  जिल्ह्यातील रस्ते, पूल, शासकीय इमारती तसेच आरोग्य सुविधांच्या बांधकामांना गती देऊन प्रलंबित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले. कामांमध्ये दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही यावेळे त्यांनी दिले.

भंडारा येथील शासकीय विश्रामगृहात आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आमदार परिणय फुके, गोंदियाचे आमदार विनोदकुमार अग्रवाल, आमदार नाना पटोले, जिल्हाधिकारी सावन कुमार, नागपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी माने, कार्यकारी अभियंता अभिजित कुचेवार, गोंदिया येथील कार्यकारी अभियंता बी. डी. रामटेके, कार्यकारी अभियंता नीता ठाकरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

भंडारा जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित एकूण १,११८.०१ किलोमीटर रस्ते आहेत. यामध्ये ४१६.९७ किलोमीटर राज्यमार्ग, ६९७.०४ किलोमीटर प्रमुख जिल्हा मार्ग आणि ४ किलोमीटर प्रमुख राज्यमार्गाचा समावेश आहे.

जिल्ह्यात विविध विकासकामांच्या ४८७ कामांना १,०५७.१३ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. प्रगतीपथावरील तसेच प्रस्तावित कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक अतिरिक्त निधीची मागणी बैठकीत करण्यात आली.

जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या पुलांची पाहणी करण्यात आली आहे. या पाहणीत सध्या कोणताही पूल धोकादायक अथवा पुनर्बांधणीसाठी आवश्यक नसल्याचे आढाव्यात स्पष्ट करण्यात आले.

बैठकीत आरोग्य विभागाशी संबंधित बांधकामांचाही आढावा घेण्यात आला. भंडारा येथील १०० खाटांच्या स्त्री रुग्णालयाच्या दुसऱ्या टप्प्यातील २५.२५ कोटी रुपयांचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. तसेच साकोली उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता ५० वरून १०० खाटांपर्यंत वाढविण्याचे ६१.२३ कोटी रुपयांचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे.

नाबार्डअंतर्गत मंजूर २९ गोदाम बांधकामांपैकी १६ कामे पूर्ण करून संबंधितांकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. मंजूर १५२ तलाठी कार्यालयांपैकी ४६ कार्यालयांची कामे पूर्ण झाली असून इतर  कामे प्रगतीपथावर आहेत.

जांब-मोहाडी-रोहा-मुंढरी रस्त्यावरील वैनगंगा नदीवरील मोठ्या पूलाचे काम प्रगती पथावर आहे.असून लाखांदूर प्रशासकीय इमारत, राज्य उत्पादन शुल्क विभागाची प्रशासकीय इमारत, भंडारा येथील व्हीआयपी विश्रामगृहाचे विस्तारीकरण तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

भंडारा बायपाससाठी १५० कोटींचा प्रस्ताव

भंडारा-तुमसर बायपाससाठी भूसंपादनाकरिता तसेच भंडारा शहरासाठी चौपदरी सिमेंट बायपास रस्ता व भूसंपादनासाठी १५० कोटी रुपयांचा प्रस्ताव असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

मोहाडी, तुमसर आणि साकोली येथे उपविभागीय कार्यालये व विश्रामगृहे उभारण्याचे प्रस्तावित आहे. कारधा-खामारी-मांडवी-खडकी रस्त्यावरील लहान पुलासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. तसेच सर्व जिल्ह्यातील ओव्हरटॉपिंग पुलांच्या पुनर्बांधणीची कामे नाबार्ड व केंद्रीय रस्ते निधीअंतर्गत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

प्रलंबित कामांसाठी निधीची मागणी

साकोली, पवनी, अड्याळ तसेच भंडारा जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रलंबित कामांसाठी निधीची आवश्यकता आहे. रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी अतिरिक्त निधी, भूसंपादन तसेच वीज व पाणी वाहिन्यांच्या स्थलांतरासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

वेळेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश‍ दिले

कामात जाणीवपूर्वक दिरंगाई किंवा कामचुकारपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच रस्ते, पूल, आरोग्य सुविधा आणि शासकीय इमारतींची कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून नागरिकांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. यावेळी गोंदिया जिल्ह्यातील विविध विकासकामांचाही आढावा घेण्यात आला.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed