• Fri. Aug 28th, 2026

दोंडाईचाचा विकास केवळ पायाभूत सुविधांपुरता नाही; निसर्ग, क्रीडा, संस्कृती अन् गुणवत्तापूर्ण जीवनावर भर– पालकमंत्री जयकुमार रावल – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 28, 2026

स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, आधुनिक वाचनालय, आर्च ब्रिज, ऑक्सिजन पार्कसह शहराच्या सर्वांगीण विकासाला गती

धुळे, दि.२८: दोंडाईचा शहराचा विकास म्हणजे केवळ रस्ते, पूल आणि काँक्रीटची बांधकामे नव्हेत. नागरिकांना निसर्गरम्य परिसर, मुला-मुलींना मैदाने व क्रीडा सुविधा, विद्यार्थ्यांना आधुनिक वाचनालय, ज्येष्ठांना विरंगुळ्याची ठिकाणे आणि सर्वांसाठी सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देत दोंडाईचाला सुंदर, सुरक्षित, हरित आणि राहण्यासाठी आनंददायी शहर म्हणून विकसित करण्याचा आपला संकल्प आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषदेच्या वतीने हुडको परिसरात सुमारे ₹१ कोटी खर्चातून उभारण्यात आलेल्या ‘नमो उद्यान’च्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष विजय पाटील, माजी नगराध्यक्ष डॉ. रविंद्र देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, बांधकाम समितीचे सभापती मुकेश देवरे, गटनेते निखिलकुमार जाधव, पाणीपुरवठा समितीच्या सभापती अपूर्वा चौधरी, नगरसेवक जितेंद्र गिरासे, मुख्याधिकारी देवेंद्रसिंग परदेशी, नगरअभियंता शिवनंदन राजपूत, उद्यान पर्यवेक्षक महेंद्र शिंदे यांच्यासह नगरपरिषदेचे सभापती, नगरसेवक, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. रावल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक सेवेतील योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून या उद्यानाला ‘नमो उद्यान’ असे नाव देण्यात आले आहे. लहान मुले, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हे उद्यान आरोग्य, मनोरंजन आणि विरंगुळ्याचे आकर्षक केंद्र ठरेल.

नमो उद्यानात विविध सुविधा

उद्यानातील पूर्वीपासून असलेल्या मोठ्या वृक्षांचे संवर्धन करून परिसर अधिक आकर्षक करण्यात येणार आहे. येथे योगा सेंटर, फुलझाडे व शोभिवंत वृक्ष, आकर्षक प्रकाशयोजना, ॲम्फीथिएटर, मुलांसाठी खेळणी, ओपन जिम आणि वॉटर फाउंटन आदी सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. नागरिकांनी उद्यानातील वृक्षांचे संगोपन करावे. मुलांनी चिमण्यांसह अन्य पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करून पर्यावरण संवर्धनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

‘मोरनगरी’लगत ३६ एकरांचा हरितपट्टा

दोंडाईचाची ओळख ‘मोरनगरी’ म्हणून निर्माण होत असून परिसरातील जैवविविधता जपण्यासाठी वृक्षलागवड आणि जंगलनिर्मितीवर भर दिला जात आहे. सध्या सुमारे १६ एकर क्षेत्रावर ऑक्सिजन पार्क विकसित करण्यात येत असून आणखी २० एकर क्षेत्रावर वृक्षसंपदा विकसित करण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारे शहरालगत सुमारे ३६ एकरांचा घनदाट हरितपट्टा निर्माण करण्याचा मानस आहे. या परिसरात पक्षी आणि मोरांचा मुक्त वावर वाढावा, अशी संकल्पना असल्याचे त्यांनी सांगितले.

₹१० कोटींतून स्टेडियम व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स

शहरातील मुला-मुलींना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ₹१० कोटींच्या निधीतून स्टेडियम आणि आधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सुमारे १० एकर जागेची आवश्यकता असून प्रस्तावित संकुलात स्विमिंग पूल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, जॉगिंग, फुटबॉल आणि वॉकिंगसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषद पदाधिकारी आणि नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

तीन मजली वाचनालय; सांस्कृतिक सभागृहाचेही नियोजन

दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषदेच्या माध्यमातून अत्याधुनिक तीन मजली वाचनालय विकसित करण्यात येत आहे. त्यात वृत्तपत्र वाचनासाठी स्वतंत्र व्यवस्था, जगभरातील माहिती व संशोधनासाठी संगणकीय सुविधा तसेच दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देत त्यांनी विविध क्षेत्रांतील मोठ्या पदांपर्यंत पोहोचावे, हा यामागील उद्देश आहे.

त्याचबरोबर दोंडाईचा हे परिसरातील सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी नाटक, विविध कलाविष्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रम नियमितपणे आयोजित करता येतील, अशा क्षमतेचे मोठे सांस्कृतिक सभागृह उभारण्याचाही मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

आर्च ब्रिज ठरणार शहराचे नवे आकर्षण

दोंडाईचातील आर्च ब्रिजचे काम वेगाने सुरू असून भविष्यात हा पूल शहराचे प्रमुख आकर्षण ठरेल. पुलाखालील नदीपात्र अधिक खोल करून तेथे बारमाही पाणी राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तापी-बुराई योजनेच्या माध्यमातून अमरावती प्रकल्प, मालपूर आणि वाडी धरणात पाणी उपलब्ध करून आवश्यकतेनुसार नदीपात्रात पाणी सोडण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याचे पालकमंत्री श्री. रावल यांनी सांगितले.

सिंधी कॉलनी परिसरातून जयपथमार्गे थेट बामणे रस्त्याला जोडणारा नवीन मार्ग विकसित करण्यात येत असून पुढील सहा महिन्यांत तो नागरिकांसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. प्रमुख रस्त्यांवर आकर्षक प्रकाशयोजना आणि विविध ऋतूंमध्ये वेगवेगळ्या रंगांची फुले देणारी झाडे लावून शहराला अधिक हिरवेगार व आकर्षक स्वरूप देण्यात येणार आहे.

सण-उत्सवातून सामाजिक एकोप्याला बळ

शहराच्या विकासाबरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनही समृद्ध झाले पाहिजे. त्यासाठी मकरसंक्रांतीनिमित्त सामूहिक पतंग महोत्सव, दिवाळीनिमित्त नदीकिनारी सपरिवार सामूहिक दीपोत्सव यांसारखे उपक्रम आयोजित करण्याचा मानस आहे. त्याचप्रमाणे १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि १ मे या राष्ट्रीय दिनांच्या कार्यक्रमांत नागरिकांनी आवर्जून सहभागी होऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

शहरातील विकासकामे दर्जेदार होण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. कामात अडथळा न आणता नागरिकांनी विकासकामांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवावे. सार्वजनिक निधीतून होणारे प्रत्येक काम उत्तम दर्जाचे आणि दीर्घकाळ टिकणारे झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

“शहराची खरी ओळख केवळ मोठी घरे किंवा महागड्या वाहनांमुळे निर्माण होत नाही; नागरिक एकमेकांशी कसे वागतात, बोलतात आणि परस्पर संबंध कसे जपतात, यातून ती घडते. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांच्या सामूहिक सहभागातून दोंडाईचा इतर शहरांपेक्षा ‘दोन पावले पुढे’ असलेले सुंदर, सुरक्षित, हरित आणि आनंददायी शहर घडवू,” असा विश्वास पालकमंत्री श्री. रावल यांनी व्यक्त केला.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed