• Mon. Sep 7th, 2026

ऑफलाईन, अनधिकृत प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांवर होणार कारवाई – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 7, 2026

मुंबई, दि. ७ – राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारेच करणे बंधनकारक असून, मंजूर क्षमतेपेक्षा जास्त किंवा ऑफलाईन पद्धतीने अनधिकृत प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार २०२५-२६ पासून राज्यातील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रणालीद्वारे करण्यात येत आहेत. या प्रक्रियेचे काटेकोर पालन करण्याबाबत शिक्षण उपसंचालकांना निर्देश देण्यात आले आहेत. काही कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मंजूर क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने प्रवेश दिले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा विद्यार्थ्यांना पुढे इयत्ता १२ वीच्या राज्य मंडळाच्या अर्ज प्रक्रियेदरम्यान अडचणी निर्माण होतात. तसेच प्रवेश नियमित न झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाने ऑफलाईन पद्धतीने प्रवेश देऊ नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या सूचनांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित कनिष्ठ महाविद्यालय तसेच मुख्याध्यापकांविरुद्ध महाराष्ट्र कर्मचारी खासगी शाळा (सेवेच्या शर्ती) अधिनियम, १९७७ व नियमावली, १९८१ मधील तरतुदींनुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशारा शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी दिला आहे.

00000

बी.के. झंवर/विसंअ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed