• Wed. Jun 17th, 2026

    स्वच्छ व नियमित पाणीपुरवठ्यासाठी तातडीने कार्यवाही करा –  मंत्री आदिती तटकरे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 10, 2026
    स्वच्छ व नियमित पाणीपुरवठ्यासाठी तातडीने कार्यवाही करा –  मंत्री आदिती तटकरे – महासंवाद

    मुंबई, दि. १० : श्रीवर्धन नगरपालिकाहद्दीतील नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणी पुरवठा व्हावा, यासाठी तातडीने कार्यवाही करावी. रानवली धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आखाव्यात, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

    श्रीवर्धन नगरपालिका हद्दीतील विविध पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हा नगरप्रशासन अधिकारी विराज लबडे, उपनगराध्यक्ष अनंत गुरव, मुख्याधिकारी राठोड तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते.

    मंत्री तटकरे म्हणाल्या की, नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेली पाणीपुरवठ्याची समस्या तातडीने सोडविणे आवश्यक आहे. त्यासाठी रानवली धरणातून आराठी, धोंड गल्ली आणि जीवना बंदर परिसरातील साठवण टाक्यांमध्ये पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था करावी, यामुळे नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणी मिळण्यास मदत होईल आणि पाण्याचे समान वितरणही शक्य होईल. पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती मिळावी यासाठी स्थानिक स्तरावर पाणी वितरणाचे वेळापत्रक जाहीर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

    याशिवाय श्रीवर्धनच्या पर्यटनविकासाच्या दृष्टीनेही विविध उपाययोजना राबविण्यात याव्यात. पर्यटनवाढीस चालना देणे, समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता राखणे, पर्यटनाशी संबंधित रोजगाराच्या संधी निर्माण करणे, पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे यावर भर देण्याच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

    ०००

    श्रद्धा मेश्राम/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed