• Sat. Aug 15th, 2026

दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 15, 2026

मुंबई, दि. १५ : विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. महाराष्ट्राचा विकास करताना शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यासोबतच महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, क्रांतिकारक तसेच देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन करून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मंत्रालय येथे भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, याप्रसंगी ते बोलत होते.

Milind Kadam M4B

महाराष्ट्राचा आर्थिक विकासदर ८.८ टक्के

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या बारा वर्षांत जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था होण्याचा टप्पा गाठला असून २५ कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्यात देशाला यश आले आहे. विकसित भारत म्हणजे केवळ विकसित अर्थव्यवस्था नव्हे, तर दीन-दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर आणि महिलांसह समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविणे होय, असे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेले राज्य असून यंदाच्या पहिल्या सहामाहीतील राज्याचा आर्थिक विकासदर जवळपास ८.८ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जिल्हा विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनविण्याचा शासनाचा प्रयत्न असून आतापर्यंत जवळपास १३ जिल्ह्यांनी निर्धारित लक्ष्य पूर्ण केले आहे. गडचिरोली, पालघर, नंदुरबार यांसह राज्यातील प्रत्येक भागात विकास पोहोचविण्यास शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्तव्यांचे भान ठेवून तिरंगा सदैव उंच ठेवण्याचा संकल्प संविधानाने नागरिकांना अधिकार दिले आहेत, त्याचबरोबर कर्तव्यांची जाणीवही करून दिली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी सर्व नागरिकांनी आपल्या कर्तव्यांचे भान ठेवून देशाचा तिरंगा सदैव उंच राहील, असा संकल्प करावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी

शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना राबविण्यात येत असून ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याच्या दिशेनेही मोठी प्रगती झाली असून सध्या ७६ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. पुढील वर्षभरात १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा संकल्प पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या मागील पिढ्यांनी दुष्काळ पाहिला; मात्र येणाऱ्या पिढीला दुष्काळ पाहावा लागू नये, यासाठी नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागात पाणी पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यातून महाराष्ट्र कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले.

महिलांना शेतकऱ्याचा दर्जा देणारे महाराष्ट्र पहिले राज्य

महिला शेतकरी कायदा तयार करून महिलांना शेतकऱ्याचा दर्जा देण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. महिलांसह समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी लक्षित योजना राबवून सर्वांना सोबत घेऊन विकास साधण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युवांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, रोजगाराच्या संधी महाराष्ट्रातील युवकांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी ‘एज्युसिटी’च्या माध्यमातून परदेशी विद्यापीठांना राज्यात आणले जात आहे. राज्यातील विद्यापीठांचा दर्जा उंचावण्यासोबतच आधुनिक आणि ‘कटिंग-एज’ शिक्षण उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र देशाचे ‘स्टार्टअप कॅपिटल’ बनले असून राज्यात सर्वाधिक गुंतवणूक आणि परकीय गुंतवणूक होत आहे. त्यामुळे युवकांसाठी रोजगाराच्या मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘देशाच्या प्रगतीत आजही महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि भविष्यातही देशाच्या प्रगतीचा सर्वात मोठा वाटेकरी महाराष्ट्र असेल,’ असा विश्वास व्यक्त केला.
ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकारी, सेनादलाचे अधिकारी, निमंत्रित नागरिक यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, राजशिष्टाचार सचिव राजेश गवांदे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मंत्रालयीन विभागांचे प्रमुख, तिन्ही सेनादलांचे प्रमुख अधिकारी, शासकीय अधिकारी -कर्मचारी आणि निमंत्रित नागरिक उपस्थित होते.

Milind Kadam M4B

मुख्य ध्वजारोहण समारंभानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, यांच्या प्रतिमांना वंदन करून पुष्पहार अर्पण केले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed