• Sat. Jun 6th, 2026
    Jalgaon News : दोन चिमुरड्यांचे प्राण वाचवले, पण 16 वर्षीय मुलीला वाचवताना नदीमचा बुडून मृत्यू; मुलगीही दगावली, जळगाव हळहळलं

    जळगावच्या भडगावमध्ये गिरणा नदीत बुडणाऱ्या दोन चिमुरड्यांना वाचवण्यात यश आले, मात्र तिसऱ्या मुलीला वाचवताना खान नदीम खान या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. १६ वर्षीय मुलीचाही यात जीव गेला असून, अवैध वाळू उपशामुळे तयार झालेले खड्डे या दुर्घटनेला कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

    जळगावमध्ये दोन मुलांना वाचवून तरुणाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जळगाव: स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता नदीत बुडणाऱ्या दोन चिमुरड्यांना जीवनदान देणाऱ्या एका धाडसी तरुणाचा तिसऱ्या मुलीला वाचवताना दुर्दैवी अंत झाला. जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील गिरणा नदीपात्रात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. या दुर्घटनेत १६ वर्षीय मुलीचाही बुडून मृत्यू झाला असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    नेमकी घटना काय?

    मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव येथील गिरणा नदीपात्रात काही मुले आंघोळीसाठी उतरली होती. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ही मुले अचानक गटांगळ्या खाऊ लागली आणि बुडू लागली. मुले बुडत असल्याचे लक्षात येताच तिथे उपस्थित असलेल्या खान नदीम खान (वय अंदाजे २५) या तरुणाने क्षणाचाही विलंब न लावता नदीत उडी घेतली.नदीमने आपल्या जीवाची बाजी लावून दोन लहान मुलांना सुखरूपपणे पाण्याबाहेर काढले. दोन जीव वाचवल्यानंतर त्याने तिसरी मुलगी काफिया शरीफ पिंजारी (वय १६ वर्षे) हिला वाचवण्यासाठी पुन्हा विहिरीसारख्या खोल पात्रात धाव घेतली. मात्र, काफियाला वाचवण्याच्या प्रयत्नात असतानाच नदीमचा दम भरला आणि दोघेही संथ वाहणाऱ्या मात्र खोल असलेल्या पाण्यात बुडाले.

    वाळू उपशामुळे मृत्यूचे सापळे?

    घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी नदीपात्राकडे धाव घेतली आणि शोधमोहीम राबवून दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. गिरणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा केला जातो. या उपशामुळे नदीच्या पात्रात ठिकठिकाणी अतिशय खोल आणि धोकादायक खड्डे तयार झाले आहेत. पाण्याचा अंदाज न येण्यामागे आणि या दुर्घटनेमागे हे कृत्रिम खड्डेच कारणीभूत असल्याचा थेट आरोप नागरिकांनी केला आहे.

    भडगाव पोलिसांत नोंद

    या घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सध्या या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोन मुलांचे प्राण वाचवून स्वतःचे बलिदान देणाऱ्या नदीमच्या धाडसाचे कौतुक होत असले, तरी या घटनेने दोन कुटुंबे उद्ध्वस्त झाल्याने भडगाव शहरावर शोककळा पसरली आहे. प्रशासनाने अवैध वाळू उपसा रोखून अशा दुर्घटना टाळाव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा