• Fri. Mar 6th, 2026

    महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ आणि मुंबई विद्यापीठात जर्मन व जपानी भाषा प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 5, 2026
    महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ आणि मुंबई विद्यापीठात जर्मन व जपानी भाषा प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार – महासंवाद

    मुंबई, दि. ५: अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच जर्मनी व जपान येथील भाषाचे ज्ञान मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ आणि  मुंबई विद्यापीठ यांच्यात जर्मन व जपानी भाषा प्रशिक्षणासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला.

    उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.  मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी विभागाचे अपर मुख्य सचिव वेणूगोपोल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर तसेच संबंधित विद्यापीठांचे कुलगुरू सचिव डॉ. मारुती जाधव, डॉ. भामरे उपस्थित होते.

    उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्या पुढाकाराने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना जर्मन आणि जपानी भाषांचे प्रशिक्षण देऊन त्यांना परदेशातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

    मंत्री पाटील म्हणाले, या करारानुसार महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाशी संलग्न तसेच स्वायत्त संस्थांमधील विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठामार्फत जर्मन व जपानी भाषांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन या दोन्ही माध्यमांतून आयोजित केले जाणार असून संबंधित भाषांची परीक्षा घेणे आणि श्रेयांक प्रदान करण्याची प्रक्रिया मुंबई विद्यापीठामार्फत राबविण्यात येणार आहे.

    प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व साहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत पदविका संस्थांशी समन्वय साधून इच्छुक विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिळणारे श्रेयांक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत अतिरिक्त श्रेयांक म्हणून नोंदविण्यात येतील. या करारामुळे पदविका विद्यार्थ्यांच्या कौशल्यवृद्धीस चालना मिळण्यासोबतच त्यांना परदेशातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांना यावेळी सांगितले.

    ०००

    अश्विनी पुजारी/वि.स.अं.

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed