राज्यात IAS अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. नागपूर महापालिकेचे विद्यमान आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) महानगर आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाकडून सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी याबाबतचे आदेश बुधवारी जारी केले. आदेशानुसार, नागपूर महानगरपालिकेतील रिक्त असलेल्या आयुक्तपदी डॉ. विपीन इटनकर यांची नियुक्ती करण्यात आली असून पुढील आदेश येईपर्यंत त्यांच्याकडे नागपूर जिल्हाधिकारी पदाचाही अतिरिक्त कार्यभार कायम राहणार आहे.
डॉ. विपीन इटनकर ऑगस्ट २०२२ पासून नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. प्रशासनातील त्यांच्या कामकाजाची दखल घेत त्यांना आता नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासोबतच शहराच्या महापालिका प्रशासनाची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर येणार आहे.
दुसरीकडे, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महानगर आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तिथे ते योगेश म्हसे यांच्या जागी पदभार स्वीकारणार आहेत. शासनाच्या आदेशानुसार, चौधरी यांनी आपला सध्याचा कार्यभार डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे सुपूर्द करून पुण्यातील नव्या पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारायचा आहे.
डॉ. विपीन इटनकर 2014 च्या बॅचचे IAS अधिकारी
डॉ. विपीन इटनकर हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) 2014 च्या बॅचचे अधिकारी आहेत. प्रशासनात येण्यापूर्वी त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले असून ते व्यवसायाने डॉक्टरही आहेत. यूपीएससी परीक्षेत यश मिळवून त्यांनी प्रशासनात प्रवेश केला. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले असून चंद्रपूर येथेही त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
डॉ. अभिजीत चौधरी यांचा प्रवास
दरम्यान, डॉ. अभिजीत चौधरी यांनीही नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्त आणि प्रशासक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. ४ जुलै २०२३ रोजी त्यांनी नागपूर मनपा आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्या कार्यकाळात पालिकेच्या आर्थिक स्थितीचा ताळमेळ राखण्याचा प्रयत्न करत राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात आली. डॉ. चौधरी यांचे शिक्षण वैद्यकीय क्षेत्रात झाले असून त्यांनी २००८ मध्ये एमबीबीएस पदवी प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) या दोन्ही सेवांमध्ये यश मिळवले आहे. २०१० साली त्यांची IPS साठी निवड झाली, तर २०११ साली IAS मध्ये त्यांची निवड झाली.
