• Fri. Mar 6th, 2026

    पर्यावरणीय दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसराचा विकास करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 5, 2026
    पर्यावरणीय दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसराचा विकास करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि. ५ : कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर येथे राज्यातूनच नव्हे, तर देशातून मोठ्या संख्येने भाविक घेत असतात. या परिसराचे पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्व आहे. या मंदिर परिसराचा विकास हा पर्यावरणीय दृष्टिकोनातून करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

    श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर विकासाचा एकूण आराखडा २५० कोटी रुपयांचा आहे, त्यापैकी ८० कोटी रुपयांची कामे सुरू झालेली आहेत. श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसराचा सुधारित १७० कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे आयोजित शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

    बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वन मंत्री गणेश नाईक, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार विनय कोरे, आमदार राहुल आवाडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे, प्रधान सचिव (ग्रामविकास) एकनाथ डवले आदी उपस्थित होते.

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ज्योतिबा मंदिर डोंगर परिसराचा विकास करताना मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात यावी. आधी लागवड केलेल्या वृक्षांचे जिवंत राहण्याचे प्रमाण वाढविण्यात यावे. डोंगर परिसरावर घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यात यावे. मंदिर परिसरात अनेक भाविक अन्नदान करीत असतात या अन्नदानाकरिता अन्न छत्रालय विकसित करण्यात यावे. येथे जास्तीत जास्त भाविक सामावून घेण्याची क्षमता असावी.

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, डोंगर परिसराचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेता, येथे असणाऱ्या वस्तीमधील सांडपाणी व्यवस्थापन करावे. येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता स्वच्छतेबाबत काटेकर नियोजन करण्यात यावे. डोंगर परिसरात असलेल्या वन जमिनीचे नियमानुसार हस्तांतरण करुन मंदिर परिसराचा विकास व्हावा, यासाठी स्वतंत्र प्राधिकरण बैठकीत सादरीकरण कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

    थोडक्यात विकास आराखडा

    कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात असलेल्या श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर विकास आराखडा आराखड्यामध्ये श्री ज्योतिबा डोंगरावरील जुन्या पायवाटांचे दुरुस्तीसह रुंदीकरण करण्यात येणार आहे. तसेच पायवाटांच्या बाजूने विविध प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या वृक्षांचे पुनर्रोपण, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, विद्युत नियंत्रण कक्ष, पोलीस कक्ष व देवस्थान व्यवस्थापन कार्यालय, यमाईदेवी मंदिर परिसरात भाविकांसाठी सुविधा केंद्र, मंदिराचे दक्षिणद्वार प्रवेश मार्गाची दुरुस्ती, शाहूकालीन हुजूरवाडा इमारत संवर्धन, कुशीरे ते गायमुख तलाव पार्किंगसह पादचारी मार्गाचा विकास, पाच मेगावॉट समतेचे वीज उपकेंद्र व सौर ऊर्जा प्रकल्प, भाविकांसाठी निवास व्यवस्था, प्राथमिक आरोग्य सुविधा कक्ष व अन्नछत्र, वाडी रत्नागिरी गावामधील रहिवासी व भाविकांसाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठा व्यवस्था करण्यात येणार आहे.

    ०००

    निलेश तायडे/विसंअ

    Supriya Sule : ’20 वर्षांनी तसंच घडतंय, मी पहिल्यांदा राज्यसभेत गेले तेव्हा बाळासाहेब हयात होते’, सुप्रिया सुळेंकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा
    Nagpur Crime: कॉलेजमधले प्रेमसंबंध, सोनालीच्या लग्नानंतरही भेटायचा; नवऱ्यानं ट्रॅप लावला, होळीला गावी आलेल्या सागरची पती-पत्नीनं मिळून हत्या केली
    Kolhapur Crime: प्रेमप्रकरणातील वादातून तुरुंगात, बाहेर येताच ओंकारवर गोळीबार; पोलिसांमुळे वाचला जीव, कोल्हापुरातील घटना

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed