Ajit Pawar Plane Accident: अजित पवार यांच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल मागील आठवड्यात जाहीर करण्यात आला. त्यात अनेक चुका असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
‘बारामती विमानतळ परिसरात अपघाताआधी काही जण विमानतळाची रेकी करण्यासाठी आले होते, असा दावा असून, यात सीआयडी व सीआयबीने लक्ष घालावे,’ अशी मागणी रोहित पवारांनी केली. ‘प्राथमिक अहवालात विमानतळाच्या रनवे २९ सोडून ११वर उतरविण्याचा प्रयत्न झाला हेदेखील सिद्ध होत आहे. मुख्य वैमानिक काही बोलत नव्हता हे ट्रान्सक्रिप्टमध्ये दिसत आहे,’ असंही ते म्हणाले.
‘एखाद्या अतिमहत्त्वाच्या किंवा कोणत्याही दुर्घटनेचा तपास होत असताना यंत्रणा डोळ्यांत तेल घालून काम करते, मात्र, हा अहवाल पाहता कमालीची निष्काळजी असल्याचे दिसत आहे. अहवालात बारामतीचा उल्लेख जिल्हा असा केला असून, बारामती महापालिका असाही उल्लेख आहे. एएआयबीचे गांभीर्य यातून दिसत आहे. अहवालात विमान झाडांना धडकल्याचे म्हटले आहे, परंतु अपघातस्थळी कुठलीही झाडे नाहीत, साध्या झुडुपालाही स्पर्श झाला नव्हता. परंतु द्यायचा म्हणून अहवाल दिला. झाडांवर जबाबदारी टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न यांनी केला आहे,’ असा हल्लाबोलही रोहित पवारांनी केला आहे.
‘मी व्हीएसआर, डीजीसीएच्या विरोधात नाही, आमच्यात काही वैर नाही. परंतु, या निष्काळजी असलेल्या डीजीसीएमधील अधिकाऱ्यांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ताकदवान लोकांच्या मदतीने वाचवण्याचा प्रयत्न होत असेल तर तपास योग्य पद्धतीने होणार नाही. या सर्वांकडे फौजदारी आणि तांत्रिक दृष्टीने पाहावे लागेल,’ असेही पवार यांनी सांगितले. ‘अनेक राजकीय व्यक्ती अपघातातील दोषींना वाचविण्यासाठी कामाला लागले असून, चौकशी निष्पक्ष झाली तरच हे सर्व उघड होईल,’ अशी भूमिका रोहित पवारांनी मांडली आहे.
