• Fri. Mar 6th, 2026
    ‘मराठी बाणा’चे निर्माते अशोक हांडे यांना मारहाण, पार्किंगच्या वादातून ऑफिसमध्ये घुसत बॅट उगारली

    Marathi Bana Ashok Hande beaten up : संतापलेल्या प्रथमेशने शिवीगाळ करीत अशोक हांडेंवर बॅट उगारली असता या हल्ल्यातून वाचण्याचा प्रयत्न करताना बॅट कानाजवळ बसल्याने हांडेंना दुखापत झाली.

    अशोक हांडे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘ मराठी बाणा ’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जगभरात सहा हजारांहून अधिक कार्यक्रम सादर करणारे लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक अशोक हांडे यांना पार्किंगच्या मुद्द्यावरून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत हांडे जखमी झाले असून माहीम पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे.

    नेमकं काय घडलं?

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १ मार्च रोजी घडली. अशोक हांडे हे मुंबईतील माटुंगा पश्चिमेकडील मनमाला टँक रोडवरील युनायटेड हाऊसच्या तळ मजल्यावर कार्यालयात बसले होते. याच परिसरात राहणारा प्रथमेश पांडुरंग उनफोडे उर्फ बंटी (५३) हा त्यांच्या कार्यालयात बॅट घेऊन आला. त्याने बॅटने काचेवर हल्ला करताच हांडे बाहेर आले.

    पार्किंगच्या वादातून धक्कादायक प्रकार

    त्यावेळी प्रथमेश हा कार्यालयाबाहेर पार्क करण्यात आलेल्या वाहनांचे पैसे मागू लागला. ‘मराठी बाणा’ कार्यक्रमाची वाहने या ठिकाणी नेहमी पार्किंग केलेली असतात आणि या जागेशी प्रथमेश याचा काहीच संबंध नसल्याने हांडे यांनी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या प्रथमेश याने त्यांना शिवीगाळ करीत त्यांच्यावर बॅट उगारली. या हल्ल्यातून वाचण्याचा प्रयत्न करीत असताना बॅट कानाजवळ बसल्याने दुखापत झाली.
    Maharashtra TimesSatara News : लोखंडी प्रवेशद्वार अंगावर कोसळलं, ऐन होळीला अडीच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, मुळे दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर

    पोलिसांनाही अपशब्द

    कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी या प्रकरणी हस्तक्षेप केला. तरीही प्रथमेश ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने पोलिसांना कळविण्यात आले. माहीम पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तो पोलिसांनाही ऐकत नव्हता. अखेर त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनाही त्याने अपशब्द वापरून त्यांच्या अंगावरही धावून गेल्याने सरकारी कामात अडथळा आणल्याचे कलम लावण्यात आले.
    Maharashtra TimesCrime News : स्वयंपाकावरुन सासूशी वाद, 35 वर्षीय इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं, चार वर्षांचं लेकरु मातृत्वाला मुकलं

    कोण आहेत अशोक हांडे?

    अशोक हांडे हे लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत. लेखन, दिग्दर्शन, अभिनय, संगीत, गायन, निर्मिती अशा विविध क्षेत्रात त्यांना मुशाफिरी केली आहे. पुण्यातील वारकरी कुटुंबात जन्म झालेल्या अशोक हांडे यांना लहानपणापासूनच भजन, भारुड, तमाशा यासारख्या लोककलांची आवड होती. मुंबईतील लालबाग परिसरात आल्यानंतर त्यांच्यातील कलागुणांना अधिक वाव मिळाला. मराठी बाणा हा महाराष्ट्रीय संस्कृतीचा परामर्श घेणारा लोकप्रिय सांगितीक आविष्कार त्यांचीच निर्मिती आहे.

    देवा भाऊंचा चमत्कार आणि नितेश राणेचं स्वप्न पूर्ण, गाऱ्हाणं घालून रो रो सेवा सुरु

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा