महाविकास आघाडीतील या घडामोडींची माहिती शिवसेनेचे नेते (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वरून दिली. “राज्यसभेच्या जागेसाठी चर्चा करण्यासाठी आज सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी भेट घेतली. मात्र आजच्या बैठकीत राज्यसभेच्या जागेबाबत कोणताही निर्णय झाला नाही. निर्णय लवकरच होईल,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यायच्या सात जागांसाठी येत्या १६ मार्चला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या, गुरुवारी संपत आहे. त्यामुळे आघाडीत भेटीगाठींना वेग आला आहे. आघाडीतील शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गट या तिघांनी राज्यसभेच्या सातव्या जागेवर दावा सांगितला आहे. त्यामुळे उमेदवारीवरून आघाडीत रस्सीखेच आहे. सुळे यांनी काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादीने शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचे निश्चित केले आहे. मात्र, विधानसभेत पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांना ठाकरे गट आणि काँग्रेसची मदत घ्यावी लागत आहे. राज्यसभेची सातवी जागा शरद पवार यांनी लढवली, तर निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.
भाजपाध्यक्ष नवीन राज्यसभेवर जाणार
महाराष्ट्र (सात), ओडिशा (चार), तेलंगण (दोन), तमिळनाडू (सहा), छत्तीसगड (दोन), पश्चिम बंगाल (पाच), आसाम (तीन), हरियाणा (दोन), हिमाचल प्रदेश (एक) आणि बिहार (पाच) अशा जागा रिक्त होत आहेत. उमेदवारी अर्जासाठी पाच मार्च शेवटची तारीख आहे. आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना मंगळवारी बिहारमधून पक्षाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. सत्ताधारी भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात पश्चिम बंगाल माजी प्रदेशाध्यक्ष राहुल सिन्हा आणि छत्तीसगड प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मी वर्मा यांना संबंधित राज्यांतून उमेदवारी दिली आहे.
आसामचे सार्वजनिक बांधकाममंत्री जोगेन मोहन आणि आमदार तेरस गोवाला हे राज्यसभेसाठी भाजपचे उमेदवार असतील. भाजपने ओडिशा प्रदेशाध्यक्ष मनमोहन समल आणि विद्यमान राज्यसभा खासदार सुजीतकुमार यांनाही उमेदवारी दिली आहे. भाजप नेते शिवेशकुमार बिहारमधून आणि माजी लोकसभा खासदार संजय भाटिया हरियाणामधून पक्षाचे उमेदवार असतील. कुमार हे बिहार भाजपचे सरचिटणीस आहेत. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने उमेदवारांच्या नावांना मान्यता दिली आहे, असे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी सांगितले.
अध्यक्ष नवीन बिहारमधील बंकीपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. जे. पी. नड्डा आणि अमित शहा हे देखील भाजपचे अध्यक्ष झाल्यानंतर राज्यसभेवर गेले होते.