• Fri. Mar 6th, 2026
    पवारांच्या चेल्यानं रणशिंग फुंकले, साखर कारखाना निवडणुकीसाठी दंड थोपटले, कृष्णाकाठी उडणार धुरळा

    Krishna Co Operative Sugar Factory Election : कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा अविनाश मोहिते यांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    सुधीर पाटील, सातारा : पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी कारखान्याचे माजी चेअरमन आणि संस्थापक पॅनेलचे नेते अविनाश मोहिते यांनी पुन्हा दंड थोपटले आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि दिवंगत अजित पवार यांचे ते कट्टर समर्थक आहेत. रेठरे बुद्रुकमध्ये नुकताच कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कारखान्याची निवडणूक पूर्ण ताकदीने लढविणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे कृष्णाकाठी राजकीय धुरळा उडणार आहे. कारखान्यावर सध्या भाजप आमदार डॉ. अतुल भोसले यांची सत्ता असून डॉ. सुरेश भोसले हे विद्यमान चेअरमन आहेत.

    अविनाश मोहितेंची घोषणा

    तमाम ऊस उत्पादक शेतकरी आणि कष्टकरी कामगारांच्या स्वाभिमान आणि कल्याणासाठी संस्थापक पॅनेल यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा अविनाश मोहिते यांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली. कारखान्याची सध्याची अवस्था पाहताना मन विषण्ण होते. ज्या कारखान्याने सहकारात आदर्श निर्माण केला, त्या कारखान्याचा सामान्य सभासद आणि रात्रंदिवस राबणारा कामगार आज दुर्लक्षित आहे. सभासद आणि कामगारांच्या स्वाभिमानासाठी आम्ही एका नव्या संघर्षाचे रणशिंग फुंकत आहोत, असे त्यांनी जाहीर केले.
    Maharashtra TimesUnmesh Patil : आधी भाजप सोडली, आता ठाकरेंना; माजी खासदार उन्मेष पाटलांचा ‘जय महाराष्ट्र’, शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला

    सत्ताधाऱ्यांवर ताशेरे

    अविनाश मोहिते पुढे म्हणाले की, गेल्या १० वर्षांत विद्यमान सत्ताधाऱ्यांनी कारखान्याचे काय करून ठेवले आहे, हे सर्वांच्या समोर आहे. कामगारांच्या पगारवाढीचा प्रश्न असो, पदोन्नती (बढती) असो वा हक्काचा उच्चांकी बोनस; आजच्या प्रशासनाने कामगार आणि अधिकारी वर्गाच्या हिताकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. इरिगेशन स्कीम्स (उपसा जलसिंचन योजना) बंद पडल्या आहेत किंवा अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. सभासदाचे म्हणणे ऐकून घ्यायला कोणीही जबाबदार व्यक्ती उपलब्ध नसते, ही देखील शोकांतिका आहे. संस्थापक पॅनेलने २०१० साली कृष्णा कारखान्यात ऐतिहासिक सत्तांतर केले होते. त्या पाच वर्षांत आम्ही सभासदांना FRP पेक्षा ३४१ कोटी रुपये सरासरी जास्त दर देऊन इतिहास घडवला होता. कामगार आणि अधिकारी वर्गाला सन्मानाची वागणूक दिली. वेळेवर पगारवाढ आणि विक्रमी बोनस दिला. २०१५ मध्ये देखील तुम्ही आम्हाला भरभरून मतदान केले होते, पण तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी सरकारी यंत्रणेचा वापर करून, मतमोजणीत फेरफार करून निकाल बदलला असा खळबळजनक आरोप अविनाश मोहिते यांनी केला.
    Maharashtra TimesRajya Sabha Election : राष्ट्रहितासाठी ठाकरेंनी राज्यसभेचा हट्ट सोडावा, काँग्रेसने गणित मांडलं; समीकरण तेच, तरी मविआत पेच

    ‘कृष्णे’त परिवर्तन घडवू’

    आम्ही आता स्वस्थ बसणार नाही. कराड, वाळवा, कडेगाव आणि खानापूर या चारही तालुक्यातील सभासदांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आम्ही संपर्क दौरे सुरू करत आहोत. रखडलेली पगारवाढ आणि सन्मान परत मिळवून देऊ. बंद पडलेल्या योजना पुन्हा कार्यान्वित करू आणि उसाला योग्य दर देऊ. कारखान्याचा कारभार पुन्हा एकदा सभासदांच्या हिताचा करू. संस्थापक पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. सभासदांच्या संपर्कात राहून पुढच्या तीन ते चार महिन्यात येणारी पंचवार्षिक निवडणूक संस्थापक पॅनेल पूर्ण ताकदीने लढवेल आणि तुमच्या सर्वांच्या साथीने ‘कृष्णे’त परिवर्तन घडवेल, असा विश्वास अविनाश मोहिते यांनी यावेळी व्यक्त केला.

    Rajyasabha Election : ७व्या जागेसाठी BJP ची फिल्डिंग, मविआसमोर एक जागा राखण्याचं आव्हान

    कृष्णा कारखान्यात २०१० साली अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली संस्थापक पॅनेलने ऐतिहासिक सत्तांतर केले होते. मात्र, २०१५ साली पुन्हा डॉ. सुरेश भोसले यांची सत्ता आली. गेली दहा वर्षे भोसले गटाचीच सत्ता आहे. त्यांचे सुपुत्र डॉ. अतुल भोसले हे कराड दक्षिणचे आमदार आहेत. चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असल्याने कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीशी अनेक नेत्यांचा संबंध येतो. मात्र, सर्वाधिक सभासद हे कराड तालुक्यातील आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक अटीतटीची होणार आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा