• Fri. Mar 6th, 2026

    Pune Metro : ट्रॅफिकपासून मुक्तता, प्रवाशांना ‘नो टेन्शन’, पुणे मेट्रो विमानतळापर्यंत धावणार; कसा असेल मार्ग?

    Pune Metro : ट्रॅफिकपासून मुक्तता, प्रवाशांना ‘नो टेन्शन’, पुणे मेट्रो विमानतळापर्यंत धावणार; कसा असेल मार्ग?

    Pune Metro : पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध पातळ्यांवर विकासकामे व प्रकल्प वेगाने सुरु आहेत. या प्रकल्पांना गती देत ते लवकर पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे, असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे.

    पुणे मेट्रो विमानतळापर्यंत जाणार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुण्याच्या लोहगाव येथील विमानतळापर्यंत थेट मेट्रोने पोहोचण्याचे पुणेकरांचे स्वप्न भविष्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्याची वनाझ-रामवाडी मेट्रो मार्गिका कल्याणीनगरमार्गे विमानतळापर्यंत नेण्याचा व्यवहार्य पर्याय निश्चित करण्यात आला असून, त्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) लवकरच महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) पुणे महापालिकेला सादर केला जाणार आहे.

    हिरवा कंदील दाखविला

    केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सहा विविध पर्यायांमधून कल्याणीनगर येथूनच विमानतळापर्यंत मेट्रो नेण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी हिरवा कंदील दाखविला. त्यानुसार, ‘डीपीआर’ पूर्ण करण्याच्या सूचना ‘महामेट्रो’ला करण्यात आल्याची माहिती मोहोळ यांनी दिली.
    Maharashtra TimesPune News : फरारी वर्ल्डमध्ये गेम खेळताना हल्ला, पुण्यातील दहा मित्र दुबईत अडकले, शिंदेंकडून थेट फोनवरुन धीर

    प्रवाशांची गैरसोय

    वनाझ ते रामवाडी दरम्यानच्या मेट्रो मार्गिकेचा विस्तार पुढे वाघोली-विठ्ठलवाडीपर्यंत केला जाणार आहे. मात्र, लोहगाव विमानतळापर्यंत मेट्रो नसल्याने प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन त्यासाठीचा ‘डीपीआर’ तयार करण्याचा आदेश यापूर्वीच देण्यात आला होता. मोहोळ यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी विविध सहा पर्यायांचे सादरीकरण त्यांच्यासमोर केले. त्यावर चर्चा करून अखेर कल्याणीनगरच्या सध्याच्या स्थानकाच्या पुढून ‘स्पर लाइन’द्वारे मेट्रो विमानतळापर्यंत नेणे शक्य असल्याने त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्या दृष्टीने ‘डीपीआर’ला अंतिम स्वरूप देऊन तो महापालिकेकडे सादर करण्याचा आदेश देण्यात आला. वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या दोन मेट्रो मार्गिकांचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचा दावा मोहोळ यांनी केला.

    महामार्गाने मेट्रो

    सध्या हडपसर येथील शेवाळेवाडी येथे पीएमपी डेपो आहे. शहराचा विस्तार पाहता शेवाळेवाडी-कात्रज-वाकड फाटा दरम्यानच्या मेट्रोसाठी सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे. हा संपूर्ण मेट्रो मार्ग महामार्गाशी समांतर पद्धतीने विकसित करण्याच्या दृष्टीने ‘महामेट्रो’कडून चाचपणी केली जाणार आहे.
    Maharashtra TimesPune Holi Event Accident: पुण्यात ‘रंगाचा भंग’! होळी खेळताना लाईटचा गर्डर कोसळून 4 तरुण जखमी, आयोजकांवर गुन्हा

    कसा असेल हा मार्ग?

    कल्याणीनगरच्या पुढे सिम्बायोसिस कॉलेजमार्हे विमानतळानजीकच्या एरोमॉलपर्यंत मेट्रो नेण्यात येण्याची शक्यता.

    कमीत कमी भूसंपादन करावे लागणार असल्याने या मार्गाला प्राधान्य.

    संरक्षण मंत्रालयाच्या हद्दीतील वेगळी कोणतीही जागा घेण्याऐवजी केवळ रस्त्यावरुन मेट्रो नेण्यात येणार असल्याने त्यासाठी लवकर परवानगी मिळण्याची शक्यता.

    या मार्गाचा सविस्तर अहवाल सादर झाल्यानंतर पुढील वेगवेगळ्या मान्यता गतीने करण्याचा प्रयत्न केला जाणार.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा