• Wed. Sep 23rd, 2026

Jay Pawar cries hearing Ajit Pawar voice : “…आईचा फोटो पाहून खूप बरं वाटलं… आई रडत असते का रे अजून? तिला सांगा रडू नकोस, तिचा अजित आजही तिच्याच जवळ आहे…” असे हुबेहूब अजित पवार यांच्या आवाजातील शब्द कानी पडताच सुपुत्र जय पवार यांना अश्रू अनावर झाले

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुण्यातील गणेशोत्सवात यंदा अनेकविध सामाजिक आणि राजकीय विषयांवरील देखावे भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अशातच पुण्यातील आंबेगाव परिसरातील एका गणेश मंडळाने साकारलेला देखावा सध्या जोरदार चर्चेत आला आहे. स्थानिक कार्यकर्ते युवराज बेलदरे यांनी आपल्या गणपती बाप्पाच्या मंडपात ‘अजित सृष्टी’ नावाचा एक आगळावेगळा देखावा उभा केला आहे. या देखाव्यात अजित पवार यांच्या राजकीय प्रवासाचा, लोकोपयोगी कामांचा आणि कौटुंबिक आठवणींचा पट उलगडण्यात आला आहे. कार्यकर्त्यांच्या विशेष आग्रहाखातर अजितदादांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी नुकतीच या देखाव्याला आवर्जून भेट दिली. मात्र, या भेटीदरम्यान घडलेल्या एका अनपेक्षित आणि मन हेलावून टाकणाऱ्या प्रसंगामुळे तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचाच कंठ दाटून आला.

पार्श्वभूमीला अजितदादांचा आवाज

या भावूक प्रसंगाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये जय पवार हे पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर उभे असलेले दिसतात. त्यांच्या हातात हळद, कुंकू आणि अक्षतांनी सजलेली पूजेची तबकडी आहे. मंडपाच्या भिंतींवर अजितदादांचे बालपणापासूनचे, तसेच पवार कुटुंबाचे आणि विविध प्रसंगांचे जुने फोटो लावलेले दिसून येत आहेत. जय पवार बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत असतानाच, देखाव्यात पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या परिचयाच्या आवाजातील एक ऑडिओ संवाद सुरू होतो.

Maharashtra TimesAzamgarh Encounter : हे कसले विधी? बायकोने पाच पुजाऱ्यांना बोलावलं, नवऱ्याचं पित्त खवळलं, एकामागून एक तिघांना संपवलं, अखेर एन्काऊण्टर

आईला सांगा रडू नकोस

त्या आवाजातून शब्द कानावर पडतात “…आईचा फोटो पाहून खूप बरं वाटलं… आई रडत असते का रे अजून? तिला सांगा रडू नकोस म्हणून, तिचा अजित आजही तिच्याच जवळ आहे…”. पुढे याच ऑडिओमध्ये, “तो माझा लहानपणीचा फोटो… सगळ्या आठवणी ताज्या झाल्या… पवार साहेब, सुप्रिया, जय, पार्थ… सगळं किती छान चाललं होतं…” असे जिव्हाळ्याचे आणि काळजाला भिडणारे शब्द घुमतात.

हाताने डोळ्यांतील पाणी पुसण्याचा प्रयत्न

वडिलांचा तो थेट संवादासारखा भासणारा आवाज आणि कुटुंबाविषयीचे भावूक शब्द ऐकताच जय पवार यांना आपल्या भावना रोखता आल्या नाहीत. ते क्षणभर पूर्णपणे स्तब्ध झाले आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. व्हिडीओमध्ये जय पवार आपल्या हाताने डोळ्यांतील पाणी पुसताना आणि स्वतःला सावरण्याचा आटोकाट प्रयत्न करताना स्पष्टपणे दिसत आहेत. वडिलांच्या आठवणींनी व्याकुळ झालेल्या जय पवारांनी कसाबसा स्वतःवर ताबा मिळवला आणि त्याच पाणावलेल्या डोळ्यांनी गणपती बाप्पाची मनोभावे आरती केली. एका मुलाची आपल्या वडिलांच्या आठवणीत झालेली ही अवस्था पाहून बाजूला उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांचेही डोळे पाणावले.

Maharashtra TimesAlwin Prakash Kunder : भारतीयाची बॉडी UAE तील गाडीत सापडली, दोन पिशव्यात 9 तुकडे, पत्नी-मुलगा बेपत्ता, गूढ मेसेजमुळे कुटुंब चक्रावलं

लाडक्या नेत्यावरील प्रेम

या प्रसंगी देखावा साकारणारे युवराज बेलदरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. ‘अजित सृष्टी’च्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याप्रती असलेली निष्ठा आणि प्रेम व्यक्त केले आहे. राजकीय धामधूम आणि व्यासपीठांवरील भाषणांच्या पलीकडे जाऊन कौटुंबिक ऋणानुबंध किती हळवे असतात, याचीच साक्ष या प्रसंगाने दिली. वडिलांच्या आवाजाने गहिवरलेल्या जय पवारांचा हा भावनिक क्षण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आणत आहे.