Lunar Eclipse : अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या विचारांना तिलांजली, पुण्यात गर्भवती महिलेने ग्रहण काळात चिरली भाजी
पुण्यात चंद्रग्रहणाच्या निमित्ताने अंधश्रद्धेविरोधात एक हटके उपक्रम राबवण्यात आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ‘सोडा अंधश्रद्धेचं ग्रहण’ हा कार्यक्रम घेण्यात आला. ग्रहण लागलं की अजूनही अनेक ठिकाणी गर्भवती महिलांना भाजी चिरू नको, कात्री लावू नको, काही खाऊ नको असं सांगितलं जातं. “ग्रहणात भाजी चिरली तर बाळाचे ओठ फाटतात”, अशी समजूत आजही काही घरांमध्ये पाळली जाते. पण पुण्यातील नांदेड सिटी, सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या चांदणी प्रफुल्ल थोरात यांनी ही समजूत फेटाळली. ग्रहण सुरू होताच त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन भाज्या चिरल्या, कात्रीने कागद कापले आणि अगदी निर्धास्तपणे जेवणही केलं.
