चिपळूणमध्ये एका नगरसेवकाच्या चालकाला गाडीत कोंबून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चालकाने काही जणांची नावे घेत गंभीर आरोप केले आहेत.
जखमी अवस्थेत फैजल कर्जीकर यांना कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या मारहाणीमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे चिपळूण शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मारहाणीवर फैजल कर्जीकर याचे गंभीर आरोप, काय-काय म्हणाला?
“मी नगरसेवक साजिद सरगुरोह यांच्या घरुन फॅक्ट्रीची चावी घेऊन आलो. मी कुलूप खोलत असतानाच मागून एक इनोव्हा कार आली. त्यातून अमान नारकर, तबिज पेचकर आणि समीर पेचकर हे गाडीतून उतरले. पेचकर बंधू हे माझ्या पत्नीचे दोन्ही मामा आहेत. ते गोलको रोडला राहतात आणि अमान नारकर हे खेडमध्ये राहतात. अमान नापकरने माझं तोंड दाबलं आणि पेचकर बंधूंनी मला गाडीत टाकलं. मला बोलायला जमत नव्हतं कारण माझं तोंड दाबलं होतं. त्यांनी गाडीतून नेलं.”
“मला त्यांनी आळीपाळीने मारहाण केली. पुढे मुस्कान दलवाई नावाची व्यक्ती गाडीत बसली. त्या व्यक्तीने देखील मारहाण केली. लोटे बाहेर गाडी बाहेर पडली. तिथून पुढे जावून मला मारहाण केली. विशेष म्हणजे मला ट्रान्सफॉरमर जवळ नेवून वीजेचा शॉक देवून जाळून टाकण्याची धमकी दिली. त्यांनी मला अमानुषपणे मारहाण केली.”
“ते व्हिडीओ बनवू इच्छित होते. त्यांना हवं ते व्हिडीओत बोलला नाहीस तर तुला ठार मारुन टाकेल, अशी अमान नारकर याने धमकी दिली. त्यांनी माझ्याकडून जबरदस्ती व्हिडीओ बनवून घेतले की, मी माझ्या बायकोला जबरदस्ती पळवून आणलं, तिच्यावर अत्याचार केले. तिच्या आई-वडिलांना मारण्याची धमकी दिली. मला आता शासनाकडून न्याय हवा.”
“माझी बायको मेहक दलवाई हिला 24 फेब्रुवारीला उपवास सोडून तिला तिच्या आजीच्या घरी सोडलं. त्यानंतर रात्री अकरा वाजता आमच्या घरी गेलो. आम्ही प्रेम विवाह केला. आम्ही दोन वर्षांपूर्वी पळून जावून लग्न केलं. त्यानंतर 7 जानेवारीला 2025 मध्ये रितसर कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर पोलीस ठाण्यात आम्ही जमा झालो.”
“या घटनेनंतर माझे शेठ नगरसेवक साजिद सरगुरोह हे माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते. त्यांनी मला खूप सपोर्ट केला. ते माझ्या कुटुंबासाठी खंबीरपणे उभे राहीले. मी पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी गेलो तेव्हा माझ्या तक्रारीनुसार तक्रार घेतली नाही. मला न्याय हवा.”
