• Fri. Mar 6th, 2026

    Kalyan Dombivli News: लोखंडी बाक आणि पाण्याचा पंप ठरले जीवघेणे; विजेच्या धक्क्याने 24 तासांत दोन कामगार जागेवर गेले

    Kalyan Dombivli News: लोखंडी बाक आणि पाण्याचा पंप ठरले जीवघेणे; विजेच्या धक्क्याने 24 तासांत दोन कामगार जागेवर गेले

    कल्याण-डोंबिवलीत विजेचा धक्का लागून दोन वेगवेगळ्या घटनांत दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. काटई येथील बिर्याणी दुकानात आणि आधारवाडीत पाण्याचा पंप सुरू करताना या दुर्घटना घडल्या आहेत.

    कल्याण शिळ रोड काटई येथे विजेच्या धक्क्याने दोन कामगारांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रदिप भणगे, कल्याण : कल्याण-डोंबिवली शहर आणि ग्रामीण भागातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये विजेचा धक्का लागून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पहिली घटना कल्याण-शिळ महामार्गावरील काटई गावच्या हद्दीतील एका बिर्याणी दुकानात घडली, तर दुसऱ्या घटनेत कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी परिसरात पाणी खेचण्याच्या पंपाचा धक्का लागून एकाचा प्राण गेला. अजयकुमार दसई गौतम (२०) आणि संदीप घोरीलाल रावत (३५) अशी मृतांची नावे आहेत.

    बिर्याणी दुकानातील बाकावर…

    अजयकुमार गौतम हा मूळचा उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील मल्लीपूर तालुक्यातील बाबुपुरा गावचा रहिवासी होता. तो गेल्या एक महिन्यापासून कल्याण-शिळ महामार्गावरील काटई येथील ‘ताज बिर्याणी’ दुकानात काम करत होता. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दुकानातील काम आटोपल्यानंतर अजयकुमार जेवण करून हात धुवायला गेला. हात ओले असतानाच त्याने दुकानात उभ्या असलेल्या एका लोखंडी बाकावर वस्तू ठेवण्याचा प्रयत्न केला. त्या लोखंडी बाकात वीज प्रवाह उतरलेला असल्याने अजयकुमारला जोराचा धक्का बसला आणि तो दूर फेकला जाऊन बेशुद्ध पडला.इतर कामगारांनी मालकाच्या मदतीने त्याला तातडीने डोंबिवली एमआयडीसीतील एम्स रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात भारतीय नागरी सुरक्षा संहिता कायद्यान्वये नोंद करण्यात आली असून कुटुंबीयांनी मृत्यूबाबत कोणताही संशय नसल्याचे पोलिसांना कळवले आहे.

    Maharashtra TimesGondia News: रंगपंचमीचा आनंद ठरला शेवटचा, तलावात बुडून दोन सख्ख्या भावांचा करुण अंत; गोंदियावर शोककळा

    पाणी खेचण्याच्या पंपाचा धक्का लागल्याने दुसरी दुर्घटना

    दुसरी घटना कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. संदीप रावत हा उत्तर प्रदेशातील होरीलाल गावचा रहिवासी असून तो आधारवाडी कारागृहासमोरील भानुदास गायकर चाळीत राहत होता. घराशेजारी पाण्याचा पंप सुरू असताना संदीप तेथे हात-पाय धुण्यास गेला. अचानक पंपातून विजेचा प्रवाह उतरल्याने त्याला जोराचा धक्का बसला आणि तो जागीच बेशुद्ध पडला.

    Maharashtra TimesChhagan Bhujbal : ‘अजितदादांचं विमान झाडावर आदळल्याचं आश्चर्य वाटलं’; तपासातील झाडाच्या थेअरीवर छगन भुजबळांना शंका

    नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी त्याला तातडीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या संदर्भात खडकपाडा पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा