पुढील ५ वर्षांत जाहिरातींच्या माध्यमातून २५० कोटींचा महसूल मिळवण्याचा महामंडळाचा संकल्प. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ३१० व्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही मोठी घोषणा केली.
संचालक मंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
एसटी महामंडळाच्या मुख्यालयात पार पडलेल्या ३१० व्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सध्या एसटीला जाहिरातींतून वार्षिक २२ कोटी रुपये मिळतात. मात्र, नव्या निविदा प्रक्रियेमुळे या उत्पन्नात दुपटीहून अधिक वाढ होणार असून, वार्षिक सरासरी ५० कोटी रुपयांपर्यंत महसूल मिळणे अपेक्षित आहे.
व्यापक जाहिरात आराखडा
मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, एसटीची पोहोच राज्यातील प्रत्येक गावखेड्यापर्यंत आहे. महामंडळाची २५१ आगारे, ६१० बसस्थानके आणि सुमारे १२ हजार बसेसचा ताफा ही जाहिरातदारांसाठी मोठी बाजारपेठ आहे. या संसाधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी बसेसचा बाहेरील आणि आतील भाग जाहिरातींसाठी उपलब्ध केला जाईल. बसस्थानक परिसर आणि इमारतींचा वापर महसूल वाढीसाठी होईल. नव्या निविदा प्रक्रियेद्वारे पारदर्शकपणे कंत्राट देण्यात आले आहे.
अटल सेतू ते नवी मुंबई विमानतळ जोडणारा Ulwe Coastal Road, प्रवासात वाचणार 25 मिनिटं; 6.7 किमी मार्ग कुठून-कसा?
तोट्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न
सध्या दररोज ५० ते ५५ लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात, ही संख्या भविष्यात १ कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. “केवळ तिकीट विक्रीवर अवलंबून न राहता, तिकीटबाह्य उत्पन्नाचे स्रोत बळकट केल्यास एसटीला भविष्यात कधीही तोट्याचा सामना करावा लागणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Ghansoli to Airoli Flyover: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीसाठी खाडीवर पूल, घणसोली ते ऐरोली उन्नत मार्गाला गती; कसा असेल मार्ग?
जुन्या जाहिरातदारांची मुदत संपताच नवीन परवानाधारकांमार्फत हे काम जलद गतीने सुरू होईल, ज्यामुळे एसटीच्या आर्थिक स्थितीला मोठी उभारी मिळणार आहे.
