नागपूरच्या कामठी परिसरात होळीच्या पूर्वसंध्येला थरार पाहायला मिळाला. बहिणीला आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याच्या वादातून १७ वर्षीय अरमान शौकत अलीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे.
बोलावून हल्ला
नवीन कामठी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत अरमान शौकत अली (वय १७, रा. कमसरी बाजार, कामठी) तसेच मोहित दीपक दहाट (वय १७) आणि यश नरेश गजभिये (वय १९) हे तिघे मित्र रविवारी रात्री सुमारे आठ वाजता मच्छी पूल, कादर झेंडा परिसरातील काही तरुणांच्या फोनवरून ड्रॅगन पॅलेस टेम्पल समोरील भागात गेले होते. संबंधित तरुणांनी त्यांना बोलावून घेतल्याचे सांगितले जात आहे. तेथे आठ ते दहा अज्ञात तरुण आधीपासून उपस्थित होते.अरमानने आपल्या बहिणीला चुकीचे मेसेज का पाठवले, याबाबत आरोपींना विचारणा केल्यानंतर दोन्ही गटांत वाद निर्माण झाला. हा वाद काही क्षणांतच तीव्र झाला आणि अज्ञात आरोपींनी सोबत आणलेल्या धारदार लोखंडी चाकूने अरमानवर हल्ला केला. आरोपींनी त्याच्या पोटावर आणि डोक्यावर वार केल्याने तो गंभीर जखमी होऊन खाली कोसळला.
Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमान अपघाताची कारणे काय? AAIB कडून 22 पानांचा प्राथमिक रिपोर्ट जारी
दोघे गंभीर जखमी
अरमानच्या मदतीला धावून गेलेल्या मोहित दहाट याच्यावरही आरोपींनी पाठीवर व पोटावर चाकूने वार केले. तसेच यश गजभियेच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आला. तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
उपचारादरम्यान मृत्यू
जखमींना तत्काळ कामठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर अरमान शौकत अली याला मृत घोषित केले. गंभीर जखमी मोहित दहाट याला पुढील उपचारासाठी मेयो रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे, तर यश गजभिये याच्यावर कामठी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Mumbai-Goa Highway: उर्वरित मुंबई-गोवा महामार्ग लवकरच पूर्ण, बाह्यवळण मार्ग, दोन पूल, रेल्वे उड्डाणपूल… कधी होणार काम?
पोलिसांचा तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. नवीन कामठी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पुरावे संकलित केले आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. होळीच्या सणाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे कामठी शहरात हळहळ व्यक्त होत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
