SSC Exam Paper Theft Case: अमरावती विभागातील या घटनेनं शिक्षण विभागातील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी रजनी शिरभाते यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथक २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ४.४० वाजता संबंधित परीक्षा केंद्रावर दाखल झाले. त्यावेळी दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर सुरू होता. पेपर संपल्यानंतर उत्तरपत्रिका तत्काळ मोजून सील करणे बंधनकारक असते. मात्र केंद्रावर ही प्रक्रिया वेळेत पार पडत नसल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. उत्तरपत्रिका सील करण्यात विलंब होत असल्याने पथकाने सखोल पाहणी सुरू केली.
Pune Accident: कात्रजमध्ये भीषण अपघात; ट्रकचे चाक अंगावरुन गेल्याने 3 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू, वडील जखमी
यावेळी अनिल हाडोळे नामक कर्मचारी संशयास्पद हालचाली करताना आढळला. चौकशीदरम्यान त्याची तपासणी करण्यात आली असता, त्याच्या शर्टमध्ये दडवून ठेवलेल्या दोन उत्तरपत्रिका सापडल्या. त्यापैकी एक इंग्रजी माध्यमाची तर दुसरी उर्दू माध्यमाची असल्याचे समोर आले. संबंधित कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्याने समाधानकारक स्पष्टीकरण दिले नाही. घटनास्थळी परीरक्षक सुधीर खोडे आणि सहपरीरक्षक सुशीलकुमार अभ्यंकर उपस्थित असूनही त्यांनी कोणतीही तातडीची कारवाई केली नसल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. सर्व उत्तरपत्रिका नियमानुसार कस्टडीत जमा करणे बंधनकारक असताना, संगनमताने दोन उत्तरपत्रिका बाहेर काढून एका खासगी व्यक्तीकडे ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष ठाकरे आणि ठाणेदार सूरज बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या घोटाळ्यामागील नेमका हेतू काय, याचा शोध घेतला जात आहे.
Mumbai Crime: आठवीतील विद्यार्थ्याची तलावात बॉडी; पोहताना बुडाल्याचा संशय, पण सत्य काही वेगळंच, तीन मित्र अटकेत
फरार आरोपीचा शोध सुरू
उपशिक्षणाधिकारी रजनी शिरभाते यांच्या तक्रारीवरून परीरक्षक सुधीर खोडे, सहपरीरक्षक सुशीलकुमार अभ्यंकर, अनिल हाडोळे व दोन अज्ञात विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोडे आणि हाडोळे यांना पोलिसांनी अटक केली असून अभ्यंकर फरार असल्याची माहिती आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. यापूर्वी वाशीम जिल्ह्यात सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता.
