• Mon. Mar 9th, 2026
    Nashik Crime: नोकरीच्या आमिषाने विवाहितेची दोन लाखांत विक्री; बळजबरीने लग्नही लावले, नाशिकमधील संतापजनक घटना

    Nashik Crime: चांगली नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने जातेगावात एका महिलेची दोन लाख रुपयांत विक्री केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    नाशिक क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: पदरात अवघ्या तीन-चार महिन्यांचे तान्हे बाळ व पतीपासून विभक्त असलेल्या महिलेच्या हतबलतेचा गैरफायदा घेत दोन नराधम महिलांनी इव्हेंट मॅनेजमेंटची नोकरी देण्याच्या बहाण्यातून महिलेची दोन लाखांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या महिलेचे नांदगाव तालुक्यातील जातेगावात एका तरुणासोबत बळजबरीने लग्नही लावण्यात आले. मात्र, सातपूर पोलिसांनी तीनशे ग्रामस्थांच्या जमावाचा वेढा मोडीत काढून पीडितेची सुखरूप सुटका केली आहे.

    सातपूरच्या कार्बन नाका भागात राहणाऱ्या या पीडित तरुणीला २७ फेब्रुवारीला राणी आणि भागी नावाच्या दोन महिला एजंटांनी आपल्या जाळ्यात ओढले. ‘तुला इव्हेंटचे चांगले काम मिळवून देतो,’ असे आमिष दाखविण्यात आले. संशयितांनी पीडितेला एका कारमध्ये बसवून मालेगावमार्गे थेट नांदगावमध्ये नेले. तेथे पोहोचल्यावर क्रूरतेचा कळस गाठून संशयित नवनाथ खिरडकर नावाच्या तरुणाकडून दोन लाख रुपये महिलांनी घेतले.

    Maharashtra TimesNashik News : आंतरजातीय लग्नामुळे बहिष्कृत, पाच वर्षांनी विवाहिता सन्मानाने माहेरी, जातपंचायत बरखास्त
    पीडितेचा विरोध असतानाही तिचे बळजबरीने नवनाथसोबत लग्न लावले. पीडितेने २८ फेब्रुवारी रोजी कसाबसा तिच्या आईला मोबाइलवरून संपर्क साधला. पीडितेने आपबिती सांगितल्यावर तिच्या पालकांनी सातपूर पोलिस ठाणे गाठले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपायुक्त किशोर काळे यांनी कारवाईचे आदेश दिले.

    Maharashtra TimesNashik News : ‘स्त्री बीज’ तस्करीचे धागेदोरे नाशिकमध्ये; महापालिकेची ‘IVF’ सेंटरला नोटीस
    पोलिसांना ग्रामस्थांचा घेराव
    सुमारे तीनशे ग्रामस्थांच्या जमावाने पोलिसांना घेराव घातला. ‘आम्ही दोन लाख रुपये देऊन या मुलीचे लग्न केले आहे. आधी आमचे पैसे द्या किंवा त्या एजंट महिलांना हजर करा. त्याशिवाय आम्ही मुलीला सोडणार नाही,’ अशी आक्रमक भूमिका जमावाने घेतली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक आयुक्त सचिन बारी यांनी नांदगाव पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी पाठवली. सातपूर आणि नांदगाव पोलिसांनी संयम आणि धाडस दाखवत जमावाचा प्रतिकार मोडीत काढत पीडितेची सुखरूप सुटका केली. या घटनेने जिल्ह्यात महिलांच्या विक्रीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. संशयित राणी आणि भागी या दोन एजंट महिलांचा पोलिस शोध घेत आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा