• Fri. Mar 6th, 2026
    Mumbai Crime: डिजिटल अटकेत विकला फ्लॅट; मुंबईत 78 वर्षीय वृद्धाची फसवणूक, तब्बल सव्वा कोटींचा गंडा

    मुंबई : डिजिटल अटकेबाबत विविध यंत्रणांकडून वारंवार जनजागृती केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ‘मन की बात’मध्ये पुन्हा याबाबत उल्लेख केला. मात्र, तरीही वयोवृद्ध व्यक्ती सायबरचोरांच्या जाळ्यात अडकत आहेत. मुलुंड येथील ७८ वर्षीय वृद्धाला अशाचप्रकारे डिजिटल अटकेत ठेवून त्याला चक्क फ्लॅट विकण्यास भाग पाडण्यात आले. प्रत्यक्षात अटक आणि शिक्षा होईल, अशी भीती दाखवून या वृद्धाकडून एक कोटी १७ लाख रुपये उकळण्यात आले.

    मुलुंड परिसरात राहणारे हे ज्येष्ठ नागरिक एका कंपनीतून संचालक म्हणून निवृत्त झाले होते. २६ डिसेंबर २०२४ रोजी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅप कॉल आला. विजय खन्ना असे नाव सांगणाऱ्या या व्यक्तीने आपण सीबीआय अधिकारी असल्याचे भासवले. त्याने जेट एयरवेजसंदर्भातील प्रकरण आणि उद्योगपती नरेश गोयल यांच्या मनी लाँड्रिंग तपासात तुमचे नाव आले आहे. तुमच्या आधारकार्डचा वापर करून कॅनरा बँकेत खाते उघडण्यात आले असून, त्यामध्ये दोन कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला आहे. या प्रकरणात तुमची चौकशी करण्याचे आदेश असून सहकार्य केले नाही तर अटक होईल, अशी धमकी देण्यात आली.

    Chembur Accident: चेंबूरमध्ये सहाव्या मजल्यावरून सहा कामगार पडले, दुर्घटनेत 55 वर्षीय कामगाराचा बळी; एकाची स्थिती गंभीर
    या प्रकरणातील काही कागदपत्रे वृद्धाला पाठवण्यात आली. सीबीआयचा लोगो असलेली ही कागदपत्रे पाहून वृद्धाला धक्का बसला. आपला या प्रकरणाशी काहीच संबंध नसल्याचे ते सांगत होते, मात्र खन्ना ऐकण्याच्या स्थितीत नव्हता.

    वृद्धाचा विश्वास बसला असून, ते प्रचंड घाबरले असल्याचे लक्षात येताच तोतया अधिकाऱ्याने हे प्रकरण अत्यंत गोपनीय असल्याचे सांगितले. याबाबत कुणाला सांगितल्यास त्या व्यक्तीलाही आरोपी करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. वृद्ध असल्याने प्रत्यक्षात अटक करीत नसून डिजिटल अटकेत ठेवत असल्याचे भासवत तोतया अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी सुरू केली.

    चौकशीदरम्यान दोन कोटी रुपयांपैकी ८० टक्के रक्कम तत्काळ भरा अन्यथा अटक होईल, अशीही भीती दाखवण्यात आली. इतकी रक्कम नसल्याने वृद्धाने आपला एक फ्लॅट विकला. त्यातून आलेल्या पैशांपैकी सुमारे एक कोटी १७ लाख रुपये वळते केले.

    Maharashtra TimesMumbai Local Update: मार्चच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचा खोळंबा; तिन्ही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक, कोणत्या लोकल रद्द?
    सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
    गुन्ह्यात सहभाग न आढळल्यास रक्कम परत केली जाईल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार वृद्धाने काही दिवसांनी पैसे परत मिळण्याबाबत विचारणा केली असता, तोतया अधिकाऱ्यांकडून आणखी पैशांची मागणी झाली. यावेळी संशय आल्याने त्यांनी अधिक माहिती काढली असता हा डिजिटल अटकेचा प्रकार असल्याचे समजले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पूर्व विभाग सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed