Baramati News: अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल विविध शंका-कुंशका उपस्थित केल्या जात आहे. याबाबतही तटकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे.
सुनील तटकरे म्हणाले की, “टीका टिप्पणी होत असते. यापूर्वी दादांबद्दल कोण काय बोलले आहे, हे सर्वांना माहिती आहे. जनसन्मान यात्रेनिमित्त स्वत: अजितदादा बारामतीतच म्हणाले होते की, मी कुटुंबात एकटा पडलो आहे. 2019 ला कोण भाजपकडे तिकीट मागायला गेले होते, हे मला आणि दादांना माहिती होतं. त्यामुळे कोण काय बोलतंय, याबद्दल मला काही वाटत नाही,” अशा शब्दांत तटकरे यांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
“अजितदादांचा आणि माझा 40 वर्षांचा प्रवास आहे. त्यांच्या अनेक गोष्टींचा मी साक्षीदार आहे. त्यामुळे कोण काय बोलतं याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. कोणालाही काही आरोप करायचे असतील तर त्यांनी स्पष्टपणे नाव घेऊन बोलावे. जो कोणी बोलतो, त्याने नाव घेऊन बोलावे. अस्पष्ट विधानांचा काही उपयोग नाही,” असा टोलाही सुनील तटकरे यांनी लगावला आहे.
विमान अपघाताच्या तपासाबद्दल काय म्हणाले तटकरे?
“सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे की, विमान अपघाताबाबत चौकशी व्हावी. केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री यांनीही चौकशीचे आदेश दिले आणि त्याची चौकशी सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि पक्षाच्या वतीने निवेदन देत चौकशी व्हावी अशी मागणी केली. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देखील चौकशीची मागणी केली असून सीबीआयद्वारे चौकशी सुरू आहे. दादांबद्दल सर्वांनाच हळहळ वाटत आहे. त्यामुळे लवकरात लवकर घटनेचा तपास लागावा, ही सर्वांची मागणी आहे,” असं तटकरे म्हणाले.
