Karanja-Revas Creek Bridge: कोकणात तयार होणाऱ्या रेवस-करंजा खाडी पुलामुळे मुंबई ते अलिबाग प्रवासात वेळ वाचणार आहे. हा 10 किमी लांब मार्ग 2028पर्यंत प्रवासासाठी खुला होण्याची शक्यता आहे.
प्रवासात वेळ वाचणार
या सेतुमुळे दक्षिण मुंबई ते अलिबागचा सुमारे 2.5 तासांचा प्रवास अवघ्या 75 मिनिटांत होणार आहे. तसेच जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPT) ते अलिबाग हे 55 किमीचे अंतर सुमारे 30 किमीवर येईल. उद्योग, लॉजिस्टिक्स आणि दैनंदिन प्रवासासाठी हा बदल मोठा ‘गेमचेंजर’ ठरणार आहे.
Navi Mumbai News: ठाणे-नवी मुंबई विमानतळ उन्नत ‘डबल डेकर’ मार्ग, 90 मिनिटांचा प्रवास अर्ध्या तासांत; कसा असेल 25 किमी लांब मार्ग?
रेवस-रेडी सागरी महामार्ग या 498 किमी लांबीच्या किनारी महामार्गावर रेवस-करंजासह एकूण सात मोठे खाडी पूल उभारले जात आहेत. या पुलांमुळे रेवस ते रेडीपर्यंतचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि अखंड होणार आहे. विशेषतः पावसाळ्यात बोट सेवा बंद असताना बारामाही रस्तामार्ग उपलब्ध राहणार असल्याने स्थानिकांना मोठा दिलासा मिळेल.
कुठे-कुठे मिळणार जोडणी?
या प्रकल्पामुळे कोकणातील नागरिकांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीटी बंदराशी थेट व वेगवान कनेक्टिव्हिटी मिळेल. निर्यात-आयात सुलभ होऊन उद्योग क्षेत्राला चालना मिळणार आहे. तसेच पर्यटन क्षेत्रालाही मोठी गती मिळेल. अलिबाग, श्रीवर्धन, हरिहरेश्वरसारख्या किनारी भागांत पर्यटकांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.
वाहतूक सुलभ झाल्याने हापूस आंबा, मासे आणि इतर कृषी उत्पादने बाजारपेठेत जलद पोहोचतील. रिअल इस्टेट आणि स्थानिक व्यवसायांना नवी उभारी मिळेल. रोजगारनिर्मिती वाढून कोकणच्या आर्थिक विकासाला बळ मिळेल.
Anjaneri-Brahmagiri Ropeway: अंजनेरी ते ब्रह्मगिरी रोपवेला चालना, भाविक अनुभवणार निसर्गरम्य सौंदर्य; कसा असेल 375 कोटींचा प्रकल्प?
एकूणच, खाडीवर उभा राहणारा हा विकासाचा सेतू कोकणचा चेहरामोहरा बदलणारा ठरणार आहे. उद्योग, पर्यटन, शेती आणि दळणवळण या सर्व क्षेत्रांना जोडणारा हा प्रकल्प रायगडसह संपूर्ण कोकणसाठी सुवर्णसंधी ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
