Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या मंगलयमय वातावरणात अनेक कलांचे सादरीकरण नागरिकांच्या मनोरंजनाच्या उद्देशाने सादर करण्यात येतात.अशाचप्रकारे लालबागच्या परिसरात लोकसंवादाच्या माध्यमातून सरकारी योजनांचा जागर करण्यात आला.
नागरिकांकडून प्रतिसाद
या अभियानाच्या माध्यमातून चिंचपोकळी, लालबाग आणि भायखळा परिसरातील विविध गणेश मंडळांमध्ये नागरिकांशी संवाद साधून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, रोजगाराच्या संधी आणि सामाजिक जनजागृती उपक्रमांची माहिती देण्यात आली. नागरिकांकडून या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
विविध सरकारी योजनांची माहिती
इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत ओबीसी समाज घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध सरकारी योजनांची माहिती ओबीसी कल्याण विभागाचे मुंबई शहरचे सहायक संचालक रविकिरण नाईक आणि विभागीय माहिती अधिकारी धोंडिराम अर्जुन यांनी दिली.
८०० रोजगार मेळाव्यांचे आयोजन
नागरिकांना योजनांची माहिती मिळावी आणि पात्र लाभार्थ्यांना त्यांचा लाभ घेता यावा, या उद्देशाने मार्गदर्शन करण्यात आले. तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत २९ सप्टेंबर २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात८०० रोजगारमेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.
लोकसंवाद अभिनयाचे माध्यम
‘पंडित दीनदयाळ रोजगार महाकुंभ महाराष्ट्र रोजगार मेळाव्यां’ची माहिती लोकसंवाद अभियानाच्या माध्यमातून विभागीय संपर्क अधिकारी काशिबाई थोरात यांनी गणेशभक्तांना दिली. मुंबईत आयोजित करण्यात येणाऱ्या १० ठिकाणच्या रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी होऊन उपलब्ध रोजगार संधींचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यासोबतच उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहितीही त्यांनी दिली.
नशामुक्त महाराष्ट्रासाठी जनजागृती
महाराष्ट्रासह मुंबईला नशामुक्त आणि अमली पदार्थमुक्त करण्यासाठी गृह विभाग व शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती नागरिकांना देण्यात आली. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी अभियानाचे सहायक पोलिस निरीक्षक किरण वाघ, पोलिस उपनिरीक्षक मुकुंद जाधव, वरिष्ठ सहायक संचालक दत्तात्रय कोकरे आणि विभागीय संपर्क अधिकारी नीलेश तायडे यांनी मार्गदर्शन केले.
H1N1: मुंबईकरांनो तब्येत संभाळा; शहरात मलेरिया, एच१ एन१चा उद्रेक; महापालिका अलर्ट मोडवर
नागरिकांच्या शंकांचे निरसन
यावेळी गणेशभक्तांनी शासकीय योजनांबाबत प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले.या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया , संपर्क साधण्याची ठिकाणे आणि उपलब्ध सुविधांबाबत मार्गदर्शकांनी नागरिकांना माहिती दिली.गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या योजना, रोजगाराच्या संधी आणि सामाजिक जनजागृतीचे संदेश थेट नागरिकांपर्यंत पोहचविणाऱ्या या उपक्रमामुळे नागरिकांना योजनांची माहिती जाणून घेण्याची आणि प्रश्नांची उत्तरे मिळविण्याची संधी उपलब्ध झाली.
