पुण्यात “माझ्या मैत्रिणीशी का बोलतोस?” या कारणावरून २१ वर्षीय तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. मध्यरात्री मेगासिटी रस्त्यावर घडलेल्या या घटनेनंतर जखमी तरुणाने ससून रुग्णालयात उपचार घेत पोलिसांत तक्रार दाखल केली असून…
कोथरुडमध्ये मध्यरात्री थरारक हल्ला
या प्रकरणी चिन्मय चंद्रकांत भोसले (वय २१, रा. विश्वशांती चौक, केळेवाडी, पौड रोड) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमित कांबळे (वय २३, गोखलेनगर), अंकुश पवार (वय १९, गोखलेनगर), अनुष्का पवार (वय १९, नवी सांगवी) आणि रिक्षीका वेलाग लेटी (वय १८, सुस गाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मैत्रिणीशी बोलण्याच्या कारणावरून आधीच वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चिन्मय भोसले वाकडेवाडी येथे नोकरी करतात. १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पत्रकारनगर येथे असताना अंकुश पवार याने “माझ्या मैत्रिणीशी का बोलतोस?” असा जाब विचारत त्यांच्याशी वाद घातला होता. ओळखीचे असल्याने त्यावेळी भोसले यांनी तक्रार केली नव्हती.
Pune News: अजित पवार विमान दुर्घटना प्रकरण: घातपात आढळल्यास गुन्हा दाखल करणार, सीआयडीचा इशारा
मेगासिटी रस्त्यावरून आरोपींची एंट्री
२४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास भोसले हे सम्यक संदीप गाडेकर (वय १८, गोखलेनगर) याच्यासोबत मेगासिटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभे होते. त्यावेळी तीन वाहनांवरून आरोपी तेथे आले. अमित कांबळे याने भोसले यांच्या गळ्यात हात टाकून “साईडला ये, बोलायचे आहे,” असे म्हणत त्यांना बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. मात्र भोसले यांनी नकार दिल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ सुरू केली.
यानंतर चौघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अंकुश पवार याने हातातील लोखंडी कोयत्याने वार करण्यासाठी धाव घेतली. स्वतःचा बचाव करण्यासाठी भोसले यांनी उजवा हात पुढे केला असता त्यांच्या बोटाला वार बसला. त्यानंतर खाली वाकलेल्या अवस्थेत त्यांच्या डोक्यात दुसरा वार करण्यात आला.
Yugendra Pawar: अजितदादांचा अपघात, VSR विमान कंपनीवरील कारवाई, राज्यसभा निवडणूक ते राष्ट्रवादी विलीनीकरण; युगेंद्र पवारांनी स्पष्ट केली भूमिका
ससूनमध्ये उपचार; पोलिस तपास सुरू
भोसले यांना वाचविण्यासाठी सम्यक गाडेकर पुढे सरसावला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. भोसले यांच्या डोक्यातून व हातातून रक्तस्राव होत असल्याचे पाहून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
जखमी अवस्थेत भोसले यांनी ससून रुग्णालय येथे उपचार घेतल्यानंतर पोलिसांत फिर्याद दिली. कोथरुड पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.
