• Sat. Mar 7th, 2026
    अंगण झाडणाऱ्या महिलेला मोकाट वळूने उडवलं, घरासमोरच प्रकार, नागपूरकरांवर भीतीचं सावट

    Nagpur Bull attacks Woman : काही समजण्याआधीच वळूने महिलेला जोरदार धडक देत जमिनीवर आपटले आणि शिंगांनी तुडवत गंभीर जखमी केले

    नागपूर महिला वळू हल्ला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर : नागपुरात मोकाट जनावरांचा वाढता वावर नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. नागपूरच्या सन्मान नगर परिसरात घडलेल्या घटनेने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घरासमोर झाडू मारत असताना अचानक एका मोकाट वळूने ६४ वर्षीय महिलेवर भीषण हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा गंभीरपणे समोर आला आहे.

    नेमकं काय घडलं?

    माहितीनुसार, वंदना देवीकर (वय ६४) या २७ जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास सन्मान नगर येथील आपल्या घरासमोर स्वच्छता करत होत्या. त्याच वेळी रस्त्यावर मोकाट फिरणारा एक वळू अचानक त्यांच्या दिशेने धावत आला. काही समजण्याआधीच वळूने त्यांना जोरदार धडक देत जमिनीवर आपटले आणि शिंगांनी तुडवत गंभीर जखमी केले. हल्ला इतका अचानक आणि भीषण होता की शेजाऱ्यांना मदतीला धाव घेण्याची संधीही मिळाली नाही.
    Maharashtra TimesPune Crime : पुण्यात मसाज पार्लरवर पोलिसांची धाड, इमारतीतून उडी मारल्याने महिलेचा मृत्यू, पतीच्या मागणीनंतर CID चौकशी

    मेंदूला गंभीर दुखापत

    आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत वळूला हुसकावून लावले आणि गंभीर जखमी अवस्थेत देवीकर यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तपासणीत त्यांच्या बरगड्या व हात-पायांतील हाडे मोडल्याचे स्पष्ट झाले. डोक्याला जबर मार लागल्याने मेंदूला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्या जवळपास तीन आठवडे अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत होत्या. सध्या त्या घरीच उपचार घेत असून कृत्रिम ऑक्सिजनच्या सहाय्याने त्यांची प्रकृती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

    Ritu Tawade | मुंबई प्रदूषित, बिल्डर्सनं नियम पाळले नाहीतर कठोर कारवाई होणार, तावडेंचे आदेश

    वळू अजूनही मोकाट

    दरम्यान, हल्ला करणारा वळू अद्याप त्याच परिसरात मोकाट फिरत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला घराबाहेर पडताना घाबरत आहेत. नागरिकांनी महानगरपालिकेच्या जनावर पकडणाऱ्या पथकाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
    Maharashtra TimesNagpur Crime : 32 वर्षीय सख्ख्या मामीसोबत किळसवाणं कृत्य, 30 वर्षीय भाच्याला अटक, बेडवर झोपल्याचं भासवून घाणेरडं काम

    मोकाट जनावरांचा वाढता त्रास

    शहरातील विविध भागांत मोकाट जनावरांचा त्रास वाढत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा, अपघातांचा धोका आणि अशा प्रकारचे जीवघेणे हल्ले यामुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. मात्र, प्रतिबंधात्मक कारवाई आणि जनावरांच्या कायमस्वरूपी बंदोबस्ताबाबत ठोस उपाययोजना होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. वंदना देवीकर यांच्यावर झालेला हा हल्ला केवळ एक अपघात नसून शहरातील मोकाट जनावरांच्या समस्येचे गंभीर चित्र आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा