नागपुरात अँटी नारकोटिक्स टास्क फोर्सने मोठी कारवाई केली आहे. टास्क फोर्सने नागपुरात तब्बल 505 किलोंचा गांजा जप्त केला आहे. या गांजाची किंमत कोट्यवधी रुपये असल्याची माहिती आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जितेंद्र खापरे, नागपूर : शहरात अंमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत नागपूर पोलीस अंतर्गत कार्यरत अँटी नारकोटिक्स टास्क फोर्सने तब्बल 505 किलो गांजा जप्त केला आहे. मौदा तालुक्यातील माथनी टोल प्लाझाजवळ सापळा रचून एका ट्रकमधून ही मोठी खेप पकडण्यात आली. या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून, ओडिशाहून नागपूरमध्ये चोरट्या मार्गाने गांजा आणला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अँटी नारकोटिक्स टास्क फोर्सच्या विशेष पथकाने मौदा येथील माथनी टोल नाक्यावर कारवाईची तयारी केली. मोबाईल लोकेशन ट्रॅकिंगच्या सहाय्याने संशयित ट्रकची हालचाल लक्षात घेण्यात आली होती. संबंधित ट्रक ओडिशामधून नागपूरच्या दिशेने येत असल्याची खात्री पटताच पोलिसांनी टोल प्लाझाजवळ सापळा रचला आणि ट्रक अडवला.
ट्रकची कसून झडती घेतली असता त्यामध्ये मालवाहतुकीच्या आड लपवून ठेवलेले सुमारे 505 किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी त्वरित संपूर्ण माल जप्त करून ट्रक चालकाला ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या गांजाची बाजारातील किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या कारवाईपूर्वी पोलिसांनी झिंगाबाई टाकळी परिसरात छापा टाकून अब्दुल वहीद उर्फ ‘खोका’ या कुख्यात ड्रग्ज तस्कराला अटक केली होती. आरोपी आपल्या सासरच्या घरातून गांजा तस्करीचे जाळे चालवत असल्याचे उघड झाले. त्याच्या घरातून सुमारे 75 किलो गांजा हस्तगत करण्यात आला होता. या दोन्ही कारवायांमुळे नागपूरमध्ये सक्रिय असलेल्या मोठ्या अंमली पदार्थ रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.
चौकशीदरम्यान अब्दुल वहीदच्या मोबाईलमधील एका संशयास्पद क्रमांकाचे लोकेशन ओडिशामध्ये असल्याचे आढळले. तो क्रमांक नागपूरकडे येत असल्याची माहिती तांत्रिक विश्लेषणातून मिळाली. त्याच आधारे पोलिसांनी मौदा टोल नाक्यावर ट्रक पकडण्याची योजना आखली आणि ही मोठी खेप जप्त करण्यात यश मिळवले.
सध्या अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाची कसून चौकशी सुरू असून, या आंतरराज्य गांजा तस्करी टोळीमध्ये आणखी कोणकोण सहभागी आहेत? याचा शोध घेतला जात आहे. ओडिशा आणि महाराष्ट्रातील संबंधित संपर्कांची माहिती गोळा केली जात आहे. या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. नागपूरमध्ये वाढत्या अंमली पदार्थांच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा