• Fri. Mar 6th, 2026

    Nagpur Crime: घरात घुसला, महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी अन् नकार देताच…; नागपुरातील घटनेनं नागरिकांमध्ये भीती

    Nagpur Crime: घरात घुसला, महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी अन् नकार देताच…; नागपुरातील घटनेनं नागरिकांमध्ये भीती

    Nagpur News: या प्रकरणात खंडणी, धमकी आणि महिलेला छळ केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    नागपुरातील घटनेनं नागरिकांमध्ये भीती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर : नागपूर शहरात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागपूर शहरातील शांतिनगर परिसरात घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. एका महिलेला जबरदस्तीने शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत, नकार दिल्यानंतर चाकूच्या धाकावर ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात शांतिनगर पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र उर्फ मोनू मनोज समुद्रे (वय २७), रा. ठक्कर ग्राम, हा २० फेब्रुवारी रोजी संबंधित महिलेच्या घरी गेला. त्याने महिलेकडे अश्लील मागणी करत जबरदस्तीने शारीरिक संबंधांची मागणी केली. मात्र महिलेने ठाम भूमिका घेत त्यास घराबाहेर जाण्यास सांगितले. महिलेकडून विरोध झाल्याने आरोपी संतापला.

    यानंतर आरोपीने आपला सूर बदलत थेट ५० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी त्याने दिली. महिला न घाबरता ठाम राहिल्याने आरोपीने चाकू काढून तिच्या मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेने आरडा ओरडा केला. महिलेच्या आरडाओरडीनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. घटनेनंतर पीडित महिलेने तात्काळ शांतिनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत तत्काळ शोधमोहीम राबवली आणि काही तासांतच आरोपीला अटक केली.

    विशेष म्हणजे, आरोपी दोन महिन्यांपूर्वीच आठ वर्षांची शिक्षा भोगून नागपुरातील तुरुंगातून बाहेर आला असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दिवसाढवळ्या घरात घुसून अशा प्रकारे धमकावण्याचे धाडस होत असल्याने कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी मात्र नागरिकांना घाबरून न जाता तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

    दरम्यान, आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याची सखोल चौकशी सुरू असून, न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. महिलांनी धैर्याने पुढे येत आवाज उठवल्यास अशा प्रवृत्तीला आळा बसू शकतो, असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा