• Fri. Mar 6th, 2026
    नो रिस्क, एक जागा जवळपास फिक्स! भाजपकडून राज्यसभेवर कोणाकोणाची वर्णी? 3 जागांसाठी मोठी चढाओढ

    Rajya Sabha Election 2026: राज्यसभेच्या ३७ जागांसाठी येत्या मार्चमध्ये निवडणूक होऊ घातली आहे. यातील ७ जागा महाराष्ट्रातील आहे. भाजपचं संख्याबळ पाहता त्यांना ४ जागा जिंकता येतील.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई/नवी दिल्ली: राज्यसभेच्या ७ जागांसाठी मार्च महिन्यात निवडणूक होणार आहे. विधानसभेत महायुतीकडे प्रचंड बहुमत असल्यानं सातपैकी सहा जागा सत्ताधाऱ्यांच्या वाट्याला जाणार आहेत. तर विरोधी बाकांवर असलेल्या महाविकास आघाडीला केवळ १ जागा जिंकता येऊ शकेल. त्यासाठी त्यांना एकजूट दाखवावी लागेल. मविआतील तीन पक्षांनी समन्वय राखला, तरच त्यांना एक जागा जिंकता येईल.

    भाजपकडे सध्या विधानसभेत १३१ आमदारांचं बळ आहे. काही अपक्ष आणि लहान पक्षांचा भाजपला पाठिंबा आहे. त्यांच्या जोरावर भाजपचे ४ उमेदवार विजयी होऊ शकतात. यापैकी एक जागा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासाठी असेल, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. रिपाईं आठवले गटाचे अध्यक्ष असलेले रामदास आठवले केंद्रात मंत्रि‍पदी कायम राहू शकतात. किंबहुना त्यांना मंत्रि‍पदी कायम राहण्यासाठी राज्यसभेचं सदस्य असणं महत्त्वाचं आहे.

    राज्यसभेवर कोणाला संधी द्यायची याचा निर्णय भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेतला जाईल. राज्यसभेवर पक्षानं निष्ठावंतांना संधी द्यावी असा सूर असल्याची माहिती उच्चपदस्थ सुत्रांनी दिली. ‘वरिष्ठ सभागृहात पक्षानं निष्ठावंतांची वर्णी लावावी, असा मतप्रवाह आहे. पण या आग्रहाला आठवले अपवाद आहेत. आठवलेंच पक्ष गेल्या दशकभरापासून भाजपच्या सोबत आहे. त्यामुळे त्यांना सत्तेत वाटा दिला जाईल,’ अशी माहिती सुत्रांनी दिली.

    रामदास आठवले यांना संधी दिल्यास दलित समाजात सकारात्मक संदेश जाईल, असं भाजप च्या थिंक टँकला वाटतं. २०१४ मध्ये लोकसभेची निवडणूक झाली. भाजपला पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळालं. त्या निवडणुकीच्या आधीच भाजप आणि रिपाईं (आठवले) यांची युती झाली. आठवले यांना लोकसभा निवडणुकीनंतर राज्यसभेवर संधी देण्यात आली.

    जुलै २०१६ मध्ये आठवले यांच्याकडे सामाजिक न्याय खात्याचं राज्यमंत्रिपद देण्यात आलं. २०१९ आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतरही त्यांचं मंत्रिपद कायम राहिलं. मार्च २०२० मध्ये आठवले यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला. भाजपनं त्यांना आपल्या कोट्यातून पुन्हा संधी दिली. ते पुन्हा खासदार झाले. आता त्यांचा कार्यकाळ २ एप्रिलला संपणार आहे.

    आठवलेंची खासदारकी निश्चित मानली जात आहे. त्यानंतरही भाजपकडे तीन जागा शिल्लक राहतात. यासाठी विनोद तावडे , सुनील देवधर, विनय सहस्रबुद्धे यांची नावं चर्चेत आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, माजी मंत्री रानसाहेब दानवे यांचीही नावं शर्यतीत आहेत.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा