• Fri. Mar 6th, 2026
    Paithan Car Accident : चालकाचा ताबा सुटला, कार थेट कालव्यात कोसळली, पती-पत्नीसह तरुण बेपत्ता; छ.संभाजीनगरमध्ये मध्यरात्री काय घडलं?

    Paithan Car Accident : छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील चांगतपुरी गावात एक विचित्र अपघात घडला आहे. यात चालकाचा ताबा सुटल्याने कार उजव्या कालव्यात कोसळलीय.

    पैठण कार अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील चांगतपुरी गावाजवळ काल रात्री एक भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट उजव्या कालव्यात कोसळली. या दुर्घटनेत कारमधील पती-पत्नीसह त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेला स्थानिक तरुण असे तिघेजण बेपत्ता झाले आहेत. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून पोलिसांकडून शोधकार्य सुरू आहेत.

    नेमकं काय घडलं?

    कारमधील मुखीद शेख आणि निलोफर मुखीद शेख (रा. कोरडगाव, ता. शेवगाव) हे प्रवासी तर रावसाहेब खडेकर असं बचावकार्यासाठी पाण्यात उतरलेला स्थानिक बेपत्ता तरुणाचं नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल सोमवारी रात्री 11 ते 11:30च्या सुमारास अलताफ पठाण हे आपली स्विफ्ट कार एमएच 12 केजे 9032 घेऊन जात होते. कारमध्ये त्यांच्यासोबत मुखीद शेख आणि त्यांच्या पत्नी निलोफर मुखीद शेख हे प्रवास करत होते. चांगतपुरी गावाजवळील कालव्याच्या पुलाजवळ चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने कार थेट पाण्यात कोसळली.

    बचावकार्य करताना दुसरी दुर्घटना

    कार कालव्यात पडताच चालक अलताफ पठाण यांनी प्रसंगावधान राखत कारबाहेर उडी मारली आणि ते सुखरूप बचावले. मात्र, कारमधील पती-पत्नी गाडीसह पाण्यात बुडाले. ही घटना समजताच स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले. यावेळी चांगतपुरी येथील रावसाहेब खडेकर हा तरुण या दाम्पत्याला वाचवण्यासाठी जीवाची पर्या न करता पाण्यात उतरला. दुर्दैवाने, पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने रावसाहेब देखील पती-पत्नीसह बेपत्ता झाला आहे. घटनेनंतर सरपंच स्थानिकांनी प्रशासनाला माहिती दिली. रात्री उशिरा जेसीबीच्या साहाय्याने कार कालव्यातून बाहेर काढण्यात आली. मात्र, बेपत्ता झालेल्या तिघांचा शोध लागला नाही.पोलीस आणि स्थानिक नागरिक शोधकार्य राबवत आहेत.

    मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांना अवकाळीने झोडपलं

    बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मराठवाड्यातील हवामानात बदल झाला आहे. सोमवारी पहाटे मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपले. बीडसह अन्य जिल्ह्यांत ढगाळ वातावरण होते. दरम्यान सोमवारी रात्री धाराशिवमध्ये पुन्हा पावसाने हजेरी लावली. लातूर जिल्ह्यात गारपीट झाल्याने पिकांचे नुकसान झाले. सोमवारी सकाळी धाराशिव शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. उमरगा तालुक्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. त्याचा जनजीवनावर परिणाम दिसून आला.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा