• Sun. Sep 13th, 2026

दिव्यांग शिबिराच्या माध्यमातून तीन हजार लाभार्थ्यांना मिळणार अत्यावश्यक साहित्य – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 22, 2026
दिव्यांग शिबिराच्या माध्यमातून तीन हजार लाभार्थ्यांना मिळणार अत्यावश्यक साहित्य – महासंवाद

नागपूर दिनांक २२ : दिव्यांगांचे जीवन  सुसह्य व्हावे तसेच आरोग्य तपासणी सोबतच त्यांना आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांसाठी आरोग्य तपासणी व साहित्य वाटपाचा अभिनव उपक्रम दिनांक ९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समितीच्या माध्यमातून या विशेष शिबिराचे आयोजन ७ ते १० ऑगस्ट २०२६ पर्यंत करण्यात आले आहे या शिबिरासाठी ३ हजार ०४८ दिव्यांगांची नोंदणी झाली असल्याची माहिती माजी आमदार संदीप जोशी व मुख्यमंत्री सचिवालयाच्या सहसचिव श्रीमती आशा पठाण यांनी मंगळवारी (२१ जुलै) दिली.

दिव्यांग शिबिराच्या नोंदणीसाठी मुख्यमंत्री सचिवालय हैदराबाद हाऊस येथे नोंदणी कक्ष सुरू करण्यात आला असून येत्या ३० जुलैपर्यंत सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत नोंदणी करता येईल. नोंदणी करताना आधार कार्ड तसेच दिव्यांगाचा प्रकार व आवश्यक असलेले साहित्य याची माहिती देणे आवश्यक आहे. दिव्यांग शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

दिव्यांग तपासणी शिबिरामध्ये विविध शाळांमध्ये शिकत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांची तपासणी प्राधान्याने करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या असून पालकांनीही आपल्या दिव्यांग पाल्यांची नोंदणी करावी.

श्री भगवान महावीर विकलांग सहाय्य समिती केंद्र व राज्य शासनाच्या विकलांग कल्याण कार्यालय तसेच मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याच या शिबिरामध्ये दिव्यांगांना पंधरा प्रकारच्या साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. यात कॅलिपर्स, कृत्रिम हात, कृत्रिम पाय, श्रवणयंत्र, व्हीलचेअर, ब्लाइंड स्टिक, फोल्डिंग वाकर, सीपी व्हील चेअर, मॉडीफाय बूट चता छडी स्टिक, कोपराचे क्रचेस आदी साहित्याचा समावेश आहे. या शिबिरा निमित्त दिनांक ७ ऑगस्ट पासून दिव्यांगांची तपासणी व माप घेण्यात येणार आहे. हे शिबिर चार दिवस सुरू राहणार आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

यावेळी नगरसेवक रितेश गावंडे, मुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्य अधिकारी सुनील मित्रा, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे डॉ. सागर पांडे आदी उपस्थित होते.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed