नेमकं काय घडलं?
सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातील खुळेवाडी येथे राहणारी विवाहिता पायल रणदिवे हिला स्वतःचं ब्युटी पार्लर सुरु करायचे होतं. त्यासाठी तिने रीतसर क्लासही लावला होता. मात्र सासरच्या मंडळींनी तिच्या स्वप्नांना सुरुंग लावल्याचा दावा केला जात आहे. शनिवारी संध्याकाळी पायलने राहत्या घरी आत्महत्या केली.
हातावर सुसाईड नोट
“हसू झालंय माझं, माझं पार्लर बंद केलं, जीव होता तो माझा, स्वप्न होतं ग.. आजपर्यंत शांत बसले पण आता नाही. चांगल्या आई-बापाची लेक आहे म्हणून निघूनपण नाही गेले. माझ्यामुळे त्रास झाला असेल तर माफी मागते” असे शब्द पेनने हातावर लिहून पायलने आयुष्य संपवल्याचा आरोप केला जात आहे.
सासरच्या कुटुंबावर गंभीर आरोप
पायलच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचीही प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे माहेरच्या मंडळींनी रणदिवे कुटुंबाकडून शारीरिक अत्याचार होत असल्याचा आरोप केला आहे.
सासरच्या मंडळींना अटक
या प्रकरणी पती शशिकांत मारुती रणदिवे, सासू छाया मारुती रणदिवे, सासरे मारुती दामू रणदिवे आणि दीर कैलास मारुती रणदिवे यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. दरम्यान गुन्हा नोंदवण्यापूर्वी नातेवाईकांनी पायलचा मृतदेह नातेपुते पोलीस ठाण्यात आणून ठेवला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतरच तिच्या माहेरच्यांनी तिचं पार्थिव घरी नेल्याची माहिती आहे.
पोस्टमार्टमनंतर कारण उलगडणार
पायलचे शवविच्छेदन केल्यानंतर तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. ऐन तारुण्यात पायलची दुर्दैवी अखेर झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.