• Thu. Mar 12th, 2026

    महाराष्ट्रात घरफोडी अन् दरोडा टाकणारे दरोडेखोर केरळचे, नाशिक पोलिसांचा सिनेस्टाईल तपास

    ByMH LIVE NEWS

    Feb 20, 2026
    महाराष्ट्रात घरफोडी अन् दरोडा टाकणारे दरोडेखोर केरळचे, नाशिक पोलिसांचा सिनेस्टाईल तपास

    नाशिक 

    नाशिक ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्यीय दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश केला आहे. केरळमधून येऊन महाराष्ट्रात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या 12 सराईत गुन्हेगारांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर या टोळीकडून तब्बल 19 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. डिसेंबर २०२५ मध्ये वाडी-वऱ्हे परिसरात एका स्कॉर्पिओ गाडीला अडवून, प्रवाशांच्या डोळ्यांत काहीतरी टाकून साडेचार लाखांची लूट या टोळीकडून करण्यात आली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपींची बोलण्याची भाषा आणि शरीरयष्टीवरून ते केरळमधील असल्याचे निष्पन्न झाले होते.

    नाशिक पोलिसांनी थेट केरळ गाठून दोन संशयित आरोपी बाबु व्ही. आर. रमन पिल्ले (वय ५४), आकाश एस. कांत श्रीकांत (वय १८) यांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली की, ही टोळी पुन्हा नाशिकमध्ये मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत आहे.

    आरोपींची चौकशी करून त्यांच्या इतर साथीदारांबाबत माहिती घेतली असता, ते पुन्हा नाशिक जिल्ह्यात लुटमार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात गेले असल्याचे त्यांनी सांगितले. या माहितीची खात्री केली असता, त्यांचे साथीदार हे महामार्गावरील वाहनांची लुट करण्याच्या उद्देशाने सिन्नर तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गालगत चारचाकी वाहनांमध्ये दबा धरून थांबलेले असल्याची खात्री झाली.

    यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि सिन्नर पोलिसांचे पथकांनी संयुक्तपणे छापा टाकून यातील नियास मुहम्मद अली (वय २६), मुहम्मद आदिल अब्दुल माजिद (वय २५), अनिलकुमार करूणाकरा कुरूप (वय ४७), सबरीनाथ विनु के. व्ही (वय २४), आसिफ हमीद (वय ४०), अब्दुल हमीद नासर (वय ३४), शहारूख पी.एस. शहाजहान (वय २६), सिरल बाबु मजिद (वय ४०), अरुणकुमार के. (वय ४४), सबीश व्ही. एस. संतोष (वय ४०), यांना ताब्यात घेतले आहे. तर इतर ०५ साथीदार हे फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

    पोलिसांनी या संशयितांकडून लोखंडी तलवारी, कोयते, टोकदार चाकू आणि मिरची पूड तसेच टोयोटा एटीओस, मारुती स्विफ्ट आणि होंडा सिटी यांसारख्या 4 महागड्या गाड्या असा एकूण 19 लाख 55 हजार 300 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने महाराष्ट्रच नव्हे तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.


     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed